पटेल महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:30 IST2016-09-06T00:30:02+5:302016-09-06T00:30:02+5:30

जे.एम. पटेल महाविद्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांच्या वाङ्मय मंडळाचे संयुक्त उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पार पडले.

The inauguration of the literary board at Patel College | पटेल महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

पटेल महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : भाषांचा दर्जा व विकासाबाबत झाली चर्चा
भंडारा : जे.एम. पटेल महाविद्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांच्या वाङ्मय मंडळाचे संयुक्त उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी महाविद्यालयातील आधुनिक सुविधा व उत्तम शैक्षणिक वातावरणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. वाङ्मय मंडळासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना विकसीत करण्यासाठी आणि त्यांच्यातून विविध कलाकार घडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपुर फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यासारख्या उपक्रमातून भावी आयुष्यात व करियरमध्ये उपयोगी पडणारी आयोजन, नियोजन, सादरीकरण यासारखी अनेक कौशल्ये देखील विकसीत होतात. याकडे त्यंनी लक्ष वेधले. भंडारा नगरीच्या सांस्कृतिक वातावरणातील मरगळ दूर करण्यासाठी जे.एम. पटेल महाविद्यालयाने पुढाकार घेऊन विविध भाषिक साहित्य परिषदा व संमेलनाच्या आयोजनाचा विचार करावा अशीही सूचना त्यांनी याप्रसंगी केली.
आपल्या स्वागतपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन शिकण्याची गरज अधोरेखित केली. नियमित अभ्यासाला जोडून निरनिराळ्या बौद्धीक आणि सांस्कृतिक उपक्रमात भाग घेण्यासाठी वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आपलाू सर्वांगिण विकास उत्तम प्रकारे होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. भारतातील भाषिक विविधतेमुळे आपण अनेक भाषांतील साहित्य अभ्यासू शकतो. परंतु त्यासोबतच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवणेही आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले.
संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.सुमंत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्दू विभागाच्या प्रा.शाहिना अंजुम यांनी केले. याप्रसंगी साहित्य मंडळाचे समन्वयक व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.अमोल पदवाड व हिंदी विभागप्रमुख डॉ.विनी ढोमणे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.कार्तिक पणीकर, प्रा.ममता राऊत, डॉ.उमेश बन्सोड, प्रा.अनिता जायस्वाल व साहित्याच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
(प्रतिनिधी)

Web Title: The inauguration of the literary board at Patel College