राज्य महामार्गावरील धूळ ठरतेय नागरिकांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:32+5:30

नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली मोठमोठे खड्डे सुध्दा तात्काळ भरण्यात येतात. मात्र त्यानंतर कुणीही लक्ष देत नाही.

Dust on state highways is dangerous for citizens | राज्य महामार्गावरील धूळ ठरतेय नागरिकांसाठी घातक

राज्य महामार्गावरील धूळ ठरतेय नागरिकांसाठी घातक

Next
ठळक मुद्देसांगूनही उपाययोजना नाही : अड्याळ - नेरला राज्यमार्गाचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत सहा महिन्यांपासून भंडारा ते निलज या राज्यमार्गाचे बांधकाम संथ गतीने सुरु आहे. लॉकडाऊन काळात काही दिवस बांधकाम बंद असले तरी अड्याळ ते नेरला या मार्गावरील बांधकामादरम्यान रस्त्यावर पाण्याचा मारा करीत नसल्याने मार्गावरील उडणारी धूळ नागरिकांच्या जीवाला घातक ठरीत आहे.
यासंदर्भात सांगूनही कंत्राटदार व कामावरील एजन्सीने दखल घेतली नसल्याने नेरला ग्रामवासी व प्रहार संघटना आंदोलनाच्या भूमिकेत दिसून येत आहे. या संदर्भात शेवटचा उपाय म्हणून तहसीलदार पवनी व अड्याळ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली मोठमोठे खड्डे सुध्दा तात्काळ भरण्यात येतात. मात्र त्यानंतर कुणीही लक्ष देत नाही. गत महिन्यातही याच बाबीवर नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी एक दोन दिवस इमानेइतबारे पाण्याचा मारा करण्यात आला होता. दरम्यान आता उद्भवलेल्या समस्येसंदर्भात दिपक पाल, मंगेश लुचे, सचिन रणदिवे, शुभम शेंडे, राहूल रोहणकर, सचिन लोहारे, अक्षय उके, कल्पना वानखेडे, प्रज्ञा रामटेके, सरपंच अनिल कोदाने व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चर्चा करुनही तोडगा नाही
नेरला येथे राज्यमहामार्गाचे बांधकाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धूळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात नेरला येथील ग्रामस्थ व सरपंचानी कंत्राटदार व अधिकारी यांना ही बाब सांगितली. परंतु सांगितलेल्या समस्येवर कधीच परिपूर्ण तोडगा अद्यापही काढण्यात आला नाही. रस्त्यावर नियमितपणे पाणी घालण्यात आले नाही तर कामही बंद करु स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. परिणामी यावर कंत्राटदार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Dust on state highways is dangerous for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.