पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:50+5:30

परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Direct launch of paper checks | पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण

पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण

ठळक मुद्देजिल्हा परिषद नोकरभरती : महिन्याभरापूर्वी परीक्षेत घोळ झाल्याने प्रशासनाने घेतली दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत घोळ झाल्याने रद्द झालेली परीक्षा गुरुवारी पुन्हा घेऊन परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. एकाच दिवशी परीक्षा आणि त्याच दिवशी निकाल घोषित करुन ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची दक्षता प्रशासनाने घेतली.
भंडारा जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीसाठी १२ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षीका या पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत घोळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे अधिकारी आणि अपेक्षेपेक्षा जास्त गुण घेणाºया चार अशा आठ जणांविरुध्द भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी एका पत्रकारपरिषदेत ही परीक्षा रद्द झाल्याचे सांगत ३० जानेवारी रोजी नव्याने परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गुरुवारी ही परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली.
परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एलईडी वॉल लावण्यात आली. याठिकाणी परीक्षा देणारे उमेदवार, सामान्य नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण पाहत होते. कदाचित अशा पध्दतीने थेट प्रक्षेपण करुन उत्तरप्रत्रिकांची तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा.

तीन जागांसाठी भरती प्रक्रिया
भंडारा जिल्हा परिषदेत तीन जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. शहरातील दोन केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. गतवेळी झालेला घोळ पुन्हा होवू नये याची प्रत्येक ठिकाणी दक्षता घेण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी यासाठी सहकार्य केले. या पारदर्शी परीक्षेच्या माध्यमातून खºया गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षेत होणारी बोगसबाजी टाळली जावी हा प्रमुख उद्देश होता. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे थेट प्रक्षेपण कुतूहलाचा विषय झाला होता. शहरातही या परीक्षेच्या थेट प्रेक्षपणाची चर्चा दिवसभर रंगली होती.

Web Title: Direct launch of paper checks