कोरोनाने पर्यटन ठप्प, अनेकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:29+5:30

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण पुढे करून कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकडे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांना पत्र लिहून सदर पर्यटनस्थळ सुरु करण्याची विनंती केली आहे.

Corona stops tourism, many starve | कोरोनाने पर्यटन ठप्प, अनेकांवर उपासमारीची वेळ

कोरोनाने पर्यटन ठप्प, अनेकांवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देरोजगारासाठी भटकंती : जिप्सी चालक, गाईड, रिसॉर्ट मालक यासह हॉटेल व्यावसायिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाने गत पाच महिन्यांपासून नागझिरा अभयारण्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळ पूर्णत: बंद असून त्यावर आधारित अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. जिप्सी चालक, गाईड, रिसॉर्ट मालक यासह हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ताडोबा आणि टिपेश्वर अभयारण्याच्या बफर झोनमध्ये कोरोना काळातही पर्यटक येत आहेत. मात्र नागझिरा अभयारण्य बंद असल्याने सर्व काही ठप्प झाले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात निसर्ग संपन्न परिसर आहे. नागझिरा अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दररोज शेकडो पर्यटक याठिकाणी भेटी देत होते. त्यामुळे येथे अनेक व्यवसाय सुरु झाले. अनेकांनी जीप्सी विकत घेऊन वनविभागाच्या मार्गदर्शनात सफारी सुरु केल्या. गाईडचा व्यवसायही चांगला सुरु होता. रिसॉर्टमध्येही पर्यटकांची गर्दी दिसायची. यासोबतच अनेक तरुणांनी परिसरात खाद्यपदार्थांचे हॉटेल्स सुरु केले होते. परंतु आता येथील वस्तूस्थिती अतिशय विदारक आहे. गत सहा महिन्यांपासून एकही पर्यटक येथे फिरकला नाही. त्यामुळे अभयारण्यावर आधारित अनेकांची उपासमार होत आहे.
अशीच स्थिती तुमसर तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या चांदपूर पर्यटन स्थळ आहे. सुंदर तलाव, निसर्गरम्य डोंगर आणि सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची रेलचेल असते. उपजीवीकेसाठी अनेकांनी या ठिकाणी पूजा साहित्य व खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने सुरु केली होती. परंतु गत पाच महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. येथील व्यवसायीकांना आता दुसरा रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चोरखमारा, बोदलकसा या जलाशयावरही भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. बोदलकसा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. परंतु तेही आता बंद आहे. परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या रोजगाराच्या संधीही यामुळे संपुष्टात आल्या आहेत.

ताडोबा-टिपेश्वर सुरु
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा आणि यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील बफर झोन सुरु आहे. तेथे कोरोना काळातही पर्यटक येत आहेत. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य पूर्णपणे बंद असल्याने समस्या वाढत आहे.

पर्यटनमंत्र्यांना मनसेचे साकडे
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण पुढे करून कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकडे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांना पत्र लिहून सदर पर्यटनस्थळ सुरु करण्याची विनंती केली आहे. यासोबतच या भागातील रस्ते, निवास व्यवस्था आदीकडेही पर्यटनमंत्र्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. लवकरात लवकर पर्यटन केंद्र सुरु करावे आणि या भागात राहणाºया नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनातून त्यांनी केली आहे.

Web Title: Corona stops tourism, many starve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.