Vaishakh Vinayak Chaturthi April 2026: एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्... मराठी वर्षातील दुसरा वैशाख महिना सुरू झाला आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मोठा सण उत्साहात झाल्यानंतर प्रथमेश असलेल्या गणपतीचे पूजन चतुर्थीला केले जाणार आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केले जाते. गणेश व्रतांमध्ये विनायक चतुर्थीचे व्रत शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे. व्रत कसे करावे, जाणून घेऊया...
सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी वैशाख विनायक चतुर्थी आहे. या दिवशी आवर्जून व्रत करावे, गणपतीचे नामस्मरण, उपासना करावी, असे सांगितले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत आवर्जून केले जाते. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे.
वैशाख विनायक चतुर्थी व्रतात गणेश पूजन कसे करावे?
विनायक चतुर्थीला दिवसभर उपवास करावा. सकाळी लवकर उठावे, नित्यकर्मे करावीत. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपती बाप्पाची स्थापना करावी. गणेशाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा.
विनायक चतुर्थीला गणपती पूजन जमले नाही तर काय करावे?
विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. अनेकदा मनात इच्छा असूनही व्रत पूजन करता येतेच असे नाही. अशावेळेस गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात. सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : Vaishakh Vinayak Chaturthi falls on April 20, 2026. Observe a fast, worship Lord Ganesha with Shodashopchar or Panchopchar puja. Offer Durva and Jashwand flowers. If unable to perform the puja, visit a Ganesha temple and offer Durva.
Web Summary : वैशाख विनायक चतुर्थी 20 अप्रैल, 2026 को है। इस दिन व्रत रखें, षोडशोपचार या पंचोपचार पूजा से गणेश जी की आराधना करें। दूर्वा और जास्वंद के फूल चढ़ाएं। पूजा करने में असमर्थ होने पर, गणेश मंदिर जाएं और दूर्वा अर्पित करें।