Makar Sankranti 2026: संक्रांतीला विशेषतः स्त्रियांनी 'या' गोष्टींचे करावे दान; होतो दुप्पट लाभ आणि कुटुंबाची प्रगती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:08 IST2026-01-13T11:05:17+5:302026-01-13T11:08:31+5:30
Makar Sankranti 2026: संक्रांतीला दानाचे विशेष महत्त्व आहे, या दिवशी तीळ गुळाचा लाडू आणि लेखात नोंद केलेल्या वस्तूंचे दान तुमच्या कुटुंबाची भरभराट करेल.

Makar Sankranti 2026: संक्रांतीला विशेषतः स्त्रियांनी 'या' गोष्टींचे करावे दान; होतो दुप्पट लाभ आणि कुटुंबाची प्रगती
मकर संक्रात हा सण सर्वांच्याच आयुष्यात गोडवा आणणारा आणि नात्यांमधील स्नेह वृद्धिंगत करणारा. या दिवशी तीळ गूळ लाडू, गूळ पोळ्या, बाजरीची भाकरी, उंधियु पुरी, जिलेबी, खिचडी असे प्रांतवार वेगवेगळे खाद्यपदार्थ असतात. मात्र यंदा षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्यामुळे एकादशीचा उपास असो वा नसो, तांदळाचे सेवन करू नये. देवाला सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवावा, मात्र आपण पथ्य पाळावे. त्याबरोबरच संसार सुखासाठी घरातील स्त्रियांनी कोणकोणत्या गोष्टींचे पालन करावे ते पुरोहित रवी क्षीरसागर गुरुजी यांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ.
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
या दिवसाचे कर्तव्य :- तीळ मिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके १९४७ पौष कृ. ११, बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:०६ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
देवीचे स्वरूप : बालव करणावर संक्रमण होत असल्याने मुख्य वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेल्या स्थितीत आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस(खीर) भक्षण करीत आहे. सर्प जाति असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनांव व नाक्षत्रनांव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त ३० आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे...!
संक्रांतीचा पुण्यकाल - १४ जानेवारी २०२६, बुधवारी दुपारी ३:०६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे.
संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन स्त्री तथा पुरुषांनी करु नये...!
एकादशी आणि संक्रांत संयोग असला तरी तिळगूळ खाता येईल.
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :-
पूर्वीच्या काळी श्रीमंत घरातील स्त्रिया सोने, भूमि, गाय, घोडा दान करत असत. मात्र हे दान आपल्याला शक्य नसले तरी वस्त्र, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, इत्यादि यथाशक्ति दान करता येईल. त्यामुळे कुटुंबियातील सदस्यांची भरभराट होते.
संकल्प :-
देशकाल कथन करून मम आत्मनः सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायुः महेश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये ।
असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी...!
Makar Sankranti 2026: आरोग्याचे संरक्षण कवच हवे असेल तर मकरसंक्रांतीपासून रोज म्हणा 'हे' स्तोत्र!
महत्वाची सुचना
दर वर्षी मकर संतक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये...!