माघ शनि प्रदोष २०२६: पंचग्रही समसप्तक योगात करा व्रत, ‘हे’ प्रभावी मंत्र म्हणा; मंगलच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:09 IST2026-02-13T11:09:32+5:302026-02-13T11:09:45+5:30
Magh Shani Pradosh February 2026: शनि प्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊन शनिच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकते, असे म्हटले जाते.

माघ शनि प्रदोष २०२६: पंचग्रही समसप्तक योगात करा व्रत, ‘हे’ प्रभावी मंत्र म्हणा; मंगलच होईल!
Magh Shani Pradosh February 2026: माघ महिना सांगतेकडे आला आहे. मराठी महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. शनिप्रदोष व्रतात शनीदेव आणि महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. माघ महिन्यातील शनि प्रदोष व्रत कधी आहे? व्रताचरण कसे करावे? कोणत्या मंत्रांचा जप करणे अतिशय शुभ ठरू शकते? जाणून घ्या...
शनिवारी प्रदोष व्रत आले की, त्याला शनि प्रदोष म्हटले जाते. अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गुरुचरित्र ग्रंथातही शनि प्रदोष व्रताची माहिती आणि महती आढळून येते. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. शनि देव महादेवांना आपले गुरु मानतात, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यामुळे शनि प्रदोष दिवशी महादेवांचे पूजन करणे विशेष लाभदायी मानले गेले आहे.
पंचग्रही समसप्तक योगात व्रत करा, दोषमुक्त व्हा
माघ महिन्यात शनिवार १४ फेब्रुवारी २०२६ रोजी शनि प्रदोष व्रत आहे. या शनि प्रदोष व्रतावेळी पंचग्रही समसप्तक योग जुळून आलेला आहे. शनिचेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि राहु असे चार ग्रह विराजमान आहेत. तसेच सिंह राशीतील केतु ग्रहाशी या ग्रहांचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. तसेच सूर्य आणि राहु-केतु यांच्या युती योगाने ग्रहण योगही जुळून आलेला आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशीही मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शनि प्रदोष व्रत कसे करावे?
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी, शनि चालिसा पठण करावे. पठण करणे शक्य नसल्यास श्रवण करावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते.
शनि प्रदोष व्रतात शिवाचे प्रभाव मंत्र अवश्य जपा
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
शनि प्रदोष व्रतात शनिचे मंत्र व उपाय आवर्जून करा
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात्॥, हा शनीचा गायत्री मंत्र आहे. ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥