Lunar Eclipse 2026: आज चंद्रग्रहण, वेध किती वाजता होणार सुरु? अन्न-पाण्यावर न विसरता ठेवा तुळशीचे पान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:35 IST2026-03-03T10:33:40+5:302026-03-03T10:35:32+5:30
Lunar Eclipse 2026: आज २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने वेध काळापासून ग्रहण सुटेपर्यंत कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

Lunar Eclipse 2026: आज चंद्रग्रहण, वेध किती वाजता होणार सुरु? अन्न-पाण्यावर न विसरता ठेवा तुळशीचे पान!
२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2026) मंगळवार, ३ मार्च रोजी होत आहे. हे ग्रहण 'पूर्ण चंद्रग्रहण' असून ते होळीच्या(Holi 2026) (धुलिवंदन) दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागांसह भारतातही ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
चंद्रग्रहणाची वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) (Lunar Eclipse Indian Time)
खगोलशास्त्रीय गणनानुसार ग्रहणाच्या वेळा खालीलप्रमाणे असतील:
ग्रहणाची सुरुवात (Penumbral Phase): दुपारी १:४२ वाजता
खंडग्रास ग्रहण प्रारंभ (Partial Phase): दुपारी २:५० वाजता
खग्रास ग्रहण प्रारंभ (Total Phase Begins): दुपारी ४:०४ वाजता
ग्रहणाचा मध्य (Maximum Eclipse): सायंकाळी ४:५४ वाजता
खग्रास ग्रहण समाप्त (Total Phase Ends): सायंकाळी ५:४४ वाजता
ग्रहणाचा मोक्ष (Partial Phase Ends): सायंकाळी ६:५८ वाजता
(भारतात ग्रहणाचे वेध सकाळी ६ वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल.)
चंद्रग्रहणाचे नियम
चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होत असतो.
१. ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे?
सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक उर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्राने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी, मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे.
२. आहार विषयक नियम (काय खावे आणि काय टाळावे?)
ग्रहणाचे वेध लागल्यापासून (सूतक काळात) जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते असे मानले जाते, त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे. ग्रहण काळात पाणी पिणेही शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे.
३. ग्रहण काळात काय टाळावे? (वर्ज्य गोष्टी)
ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे (आजारी लोकांसाठी अपवाद). ग्रहण काळात भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम करणे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळात सुरू करू नये.
४. कोणते नामस्मरण करावे? (मंत्र साधना)
ग्रहण काळ हा मंत्र सिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप हजार पटीने अधिक फळ देतो असे म्हणतात. 'ओम सोमाय नमः' चा जप करावा तसेच 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्र' म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी 'हनुमान चालीसा' किंवा 'बजरंग बाण' पठण करावे. आपल्या कुलदैवताचे नाव घेणे सर्वात जास्त प्रभावी ठरते.
ग्रहण काळात अन्न पाण्यावर ठेवा तुलसी दल
केवळ ग्रहणातच नाही, तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ लागते. हा केवळ समज नाही, तर विज्ञानानेदेखील त्याला पुष्टी दिली आहे. त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे. या दूषित वातावरणात अन्न, पाणी निषिद्ध सांगितले जाते. कारण, पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र, सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न, पाणी दूषित होते. म्हणून ग्रहण काळात अन्न, पाणीदेखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पान टाकले जाते. तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यावरही 'तुळशीचे पान' ठेवावे. यामुळे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरींचा त्यावर परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते.
ज्योतिषशास्त्रीय प्रभाव (Astrological Impacts):
१. कन्या आणि मीन राशीवर सर्वाधिक परिणाम:
हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने, कन्या आणि त्याच्या समोरील मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.
२. भावनिक अस्थिरता:
चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.
३. होळीच्या उत्सवावर परिणाम:
होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने, रंग खेळताना आणि सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चंद्र ग्रहणामुळे होलिका दहन आदल्या दिवशी म्हणजेच २ मार्च रोजी केली जाईल आणि ३ मार्चला ग्रहण काळ पाळला जाईल.
४. नैसर्गिक आणि राजकीय बदल:
या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात. शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ-उतार पाहायला मिळू शकतात.