Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:10 IST2025-08-13T14:09:24+5:302025-08-13T14:10:09+5:30
Budh Gochar 2025: होणारी कामं अडू लागली की आपण अस्वस्थ होतो, नशिबाला दोष देतो, पण त्याला ग्रहस्थितीही कारणीभूत असते; ती चांगली फळंही देते; कशी ते पहा!

Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
परमेश्वराने मानवाला जे सर्वात मोठे वरदान दिले आहे ते म्हणजे “ बुद्धी “ आणि त्यावर अंमल आहे तो बुधाचा. आता दिलेल्या बुद्धीचा वापर कसा करायचा ते मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. काही लोक ती समाजहितासाठी, आपले आयुष्य पुढे नेण्यासाठी, सन्मार्गाने जगण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी, राजमार्गाने अर्थार्जन करण्यासाठी वापरतात, तर काही कुटील मार्गाने आपल्या बुद्धीचा वापर, नाहीतर ह्रास करून घेतात.
बुध हा इटुकला पिटुकला जरी असला तरी त्याची किमया अफाट आहे, भल्याभल्यांना तोंडघशी पाडणारा हा बुध गेले काही दिवस “वक्री“ अवस्थेत होता. पृथ्वीच्या गतीपेक्षा त्याची गती कमी झाल्यामुळे तो मागे जात आहे अशी भासमान स्थिती दिसत होती. बुधाकडे बुद्धी, लेखणी, आकलनशक्ती, मज्जासंस्था, शिक्षण, प्रवास आणि सर्वात मुख्य म्हणजे संवाद असल्यामुळे हा ग्रह वक्री होऊन त्याने आपल्या सगळ्यांचेच वांदे केले होते. पण आता ११ ऑगस्टला बुध कर्क राशीतच मार्गी लागल्यामुळे आपल्याला अगदी “हुश्श “ होणार आहे. बुध मार्गी झाल्यामुळे आपल्याला अनेक अडलेल्या कामातून दिलासा आणि मार्ग मिळणार आहे.
बुध वक्री असताना संवादात गोंधळ होणे स्वाभाविक होते. आपण जे म्हणतो त्याचा समोरचा भलताच अर्थ काढतो आणि संवादाचे १२ वाजतात. गैरसमज, चुकीची कागदपत्रे, अनेक चुका झाल्यामुळे हवे ते काम वेळेत न होणे, पेपर वर्क अडकणे, बोलण्याचा गैरअर्थ, इमेल ह्यात गोंधळ झाला असेल. प्रवास वेळेत न झाल्यामुळे मिटिंग उशिरा किंवा रद्द, मग त्यावरून होणारी डोकेदुखी, ह्याला समजावू की त्याला अशी भ्रामक अवस्थाही झाली असेल. सर्व व्यवहार कमी अधिक गतीने झाले असतील. म्हणून बुध वक्री असताना महत्वाचे निर्णय, प्रवास नेहमी टाळावेत. बुध म्हणजे बातम्या, जाहिरात, मिडिया त्यामुळे नवीन उत्पादांचे अनावरण बुध वक्री असताना करू नये.
आजकालचे इंटरनेट चे युग त्यात ह्याची मेल त्याला जाणे, डेटा लॉस , फाईल करप्ट होणे ह्या सारख्या असंख्य गोष्टीना आपण गेले काही दिवस तोंड देत होतो. बुध मार्गी झाल्यावर ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत पण ऑफर आलेली नाही त्यांना ती येणार, वाट पाहत असलेले इमेल, मेसेज येणार. अर्थात तशा दशाही पूरक असाव्यात. त्यामुळे आता आपण सुटकेचा श्वास सोडून मोकळा श्वास घेत कामाचा “पुनश्च हरिओम“ करायला हरकत नाही.
इथे काही शाश्वत नाही, आज एक तर उद्या दुसरे असे बदल निसर्गात सुद्धा होतात, तर आपले जीवन ते काय. कधी कोणी मेसेज करून आपल्याला विचार करायला भाग पाडेल, तर कधी ६ महिने मेसेजच येणार नाहीत. चलता है. फार ताण घेऊ नका. आहे हे असे आहे . बुधाला राजकुमार म्हणून संबोधले आहे तेव्हा त्याचे नखरे हे असणारच.
त्यात भरीस भर म्हणून की काय “शनी“ सुद्धा वक्री आहे. सध्या आपण संयम घालवून बसलो आहोत. हो हो आपण सगळेच आणि कदाचित त्याचीच किंमत चुकवण्यासाठी आणि आपले आयुष्य शिस्तबद्ध करण्यासाठी ग्रह वक्री होत असावेत. त्यापैकी बुध तरी पूर्वस्थितीत आला आहे आणि पुढील दोन वर्ष तो अडलेली सगळी कामे मार्गी लावणार आहे.
चला तर मग कामाला लागुया, झालेले गैरसमज, कामातील चुका निस्तरुया, बिघडले आहे तिथे काही वेगळे घडेल ह्यासाठी प्रयत्न करुया, शेवटी सगळे आपलेच आहेत राव, अगदी ग्रह सुद्धा! सहमत ???
संपर्क : 8104639230