दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात, त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) तथा देवशयनी एकादशी(Devshayani Ekadashi 2025) असे म्हटले आहे. या दिवशी चातुर्मासाची(Chaturmas 2025) सुरुवात हाीते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता, महाएकादशी हे नाव सार्थ ठरते.
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्य मानतो. ज्ञानोबा-तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास(Ashadhi Ekadashi Vrat food 2025) हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे.
एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील चार महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादि कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात.
आषाढी एकादशी व्रत नियम :
एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ते उगाच नाही. वास्तविक पाहता उपासाची थाळी ही रिकामी असणे अपेक्षित आहे. मध्यंतरी समाज माध्यमांवर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपासाची थाळी या नावे फिरत होतो. आपण त्यावर गमतीने हसत असलो, तरी उपासाची थाळी धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे- रि का मी!
उपास म्हणजे काय?
उपावृत्तीच पापांची सहवास गुणी सदा,उपवास म्हणावे त्या, शरीरा शोषणे न चि।
मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये व गुणीजनांचा सहवास मिळावा या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. फक्त शरीराचे पोषण अर्थात उपास, लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपासाचे पदार्थ खाऊन उपास करत असू, तर त्याला उपास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगते.
उपास केल्याने होणारे फायदे :
उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासो गुणे हि य:।उपवास: स विज्ञेय: न शरीरस्य शोषणम् ।।
उपासाचे दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात, तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपासाच्या दिवशी मन कामात, हरीकीर्तनात, भजनात रमवावे आणि अनन्यभावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे.
हे सर्व वाचून सुगरणींचा हिरमोड झाला असेल, परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना? ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तना-मनाचा उपास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे! यंदाच्या एकादशीला तना-मनाला उपास घडवुया आणि विठ्ठल रखुमाईचे नाम घेऊया!