स्वयंघोषित महाराजांच्या जाळ्यात अडकताय? सावधान! निळोबा रायांनी सांगितली खऱ्या संतांची 'ही' ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:37 IST2026-03-21T10:36:31+5:302026-03-21T10:37:18+5:30
स्वयंघोषित ढोंगी बाबांना बळी पडू नका, खरा संत वृत्तीचा माणूस 'या' गुणांवरून ओळखा!

स्वयंघोषित महाराजांच्या जाळ्यात अडकताय? सावधान! निळोबा रायांनी सांगितली खऱ्या संतांची 'ही' ओळख
आजच्या काळात 'गुरु' आणि 'बाबा' यांची जणू लाटच आली आहे. प्रत्येकाच्या हातात माळ आणि कपाळावर टिळा दिसला की आपण त्याला 'संत' मानण्याची घाई करतो. पण, 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' असे ज्या संतांविषयी म्हटले जाते, त्यांची ओळख पटवणे आज एक मोठे आव्हान बनले आहे.
https://www.lokmat.com/bhakti/swami-samarth-prakat-din-have-you-been-blessed-by-swami-identify-these-5-invisible-signs-a-a679/स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!
संत तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा राय आणि स्वतः जगद्गुरु तुकोबांनी ढोंगीपणाचा बुरखा फाडण्यासाठी काही अमोघ कसोट्या सांगितल्या आहेत. त्या आधारे खरा गुरु आणि ढोंगी बाबा यातील फरक पडताळून पाहा.
१. जादूटोणा की नामस्मरण?
निळोबा राय म्हणतात, खरा संत तोच ज्याचा एकमेव हेतू 'विठ्ठल' (ईश्वर) आहे. त्यांना जादूटोणा, अघोरी विद्या किंवा हातचलाखीचे चमत्कार यामध्ये रस नसतो.
"तेचि संत, तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठली। नेणति काही जादूटोणा। नामस्मरणावाचोनि।।"
जो तुम्हाला देवाची गोडी लावतो तो गुरु, आणि जो स्वतःच्या 'चमत्कारांच्या' जाळ्यात अडकवतो तो ढोंगी.
२. विनम्रता की अहंकार?
खरा संत कधीच स्वतःचा उदो-उदो करत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यासारख्या जडबुद्धीच्या लोकांकडून वेद वदवले, तरी त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केले. याउलट, ढोंगी बाबा स्वतःला 'महाराज', 'ब्रह्मर्षी' किंवा 'अवतार' अशा पदव्या स्वतःच लावून घेतात आणि स्वतःच्या ज्ञानाचे प्रदर्शन करतात.
३. रंजल्या-गांजल्यांची सेवा
तुकोबा म्हणतात, जो दुःखी आणि पिडित लोकांना आपले मानतो, तिथेच देव असतो. खरा साधू निस्वार्थ भावनेने जनसेवा करतो. याउलट, ढोंगी बाबांना केवळ श्रीमंत भक्तांमध्ये आणि सोन्या-चांदीच्या दानात रस असतो. त्यांची सेवा 'सहेतुक' असते.
४. समाजाला दिशा की दिशाभूल?
खरे संत समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढतात, सन्मार्ग दाखवतात आणि कर्माचे महत्त्व पटवून देतात. ढोंगी बाबा मात्र लोकांच्या भीतीचा फायदा घेतात, त्यांना भविष्याची भीती दाखवतात आणि तोडग्यांच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करतात.
