Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 21, 2020 02:57 PM2020-09-21T14:57:51+5:302020-09-21T15:35:32+5:30

Adhik Maas 2020: प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

Adhik Maas 2020: What resolutions should be made in Adhik Maas ? What is the significance? know more. | Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

googlenewsNext
ठळक मुद्दे२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. संकल्प ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा.

ज्योत्स्ना गाडगीळ. 

पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून १६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यात पूजेइतकेच महत्त्व असते, संकल्पाला. मात्र, संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्याआधी, त्याचा अर्थ काय आणि तो कोणकोणत्या प्रकारे केला जातो, ते जाणून घेऊया. 

शपथ आणि संकल्प यातील फरक :

हाती घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस जावे, म्हणून आपण संकल्प करतो. संकल्प स्वेच्छेने केला जातो. याउलट शपथ, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने घेतली जाते. शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाचक वाटतात, तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरात घेतली जाऊ शकते, मात्र संकल्प हा चांगले कार्य तडीस नेण्यासाठीच केला जातो. म्हणून अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता, यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात. 

हेही वाचाः तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

संकल्प करत असताना म्हणायचा श्लोक :

सङकल्पमूल: कामो वै यज्ञा: सङकल्पसम्भवा:।
व्रता नियमधर्माश्च सर्वे सङकल्पजा: स्मृता।।

अर्थ : आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूमधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पानंतर संपन्न होतात, त्याचप्रमाणे सर्व व्रते, नियम व धर्म संकल्पातून निर्माण होतात. संकल्पाच्या वेळी देवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सुक्ष्म रूपाने उपस्थित होतात व संकल्प तडीस नेण्यास मदत करतात. 

संकल्प कधी करतात?

अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र, भागवतसप्ताह, चण्डी, अथर्वशीर्ष, शिवकवच इ. अनुष्ठाने आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात. संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला 'उदक' म्हणतात. उदकसेवनावाचून झालेला संकल्प व्यर्थ असतो, असे म्हणतात. नित्यसंकल्पात 'संकल्पोक्त फलवाप्यते, संकल्पोक्तसंख्यापरिपूर्तये' असे म्हटले जाते. 

हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात?

चार्तुमासात, श्रावणी सोमवारी आपण जे संकल्प करतो, त्याचीच पुनरावृत्ती अधिक मासात केली तरी चालते. त्यासाठी वेगळ्या संकल्पांचे आयोजन करण्याची गरज नाही. मूळात, फार कठीण संकल्प करू नयेत. ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा, म्हणजे तो सिद्धीस नेता येतो. 

जसे की, दर सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, रोज एखादे पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो. 

२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. 

प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

भगवान श्रीकृष्णाची तुला करत असताना, त्यांची प्रिय पत्नी सत्यभामा हिने तिजोरीतले सर्व धन पारड्यात टाकले, तरी श्रीकृष्णाचे पारडे वर जात नव्हते. तेव्हा अत्यंत भक्तीभावाने रुक्मिणीने एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवले आणि कृष्णाचे पारडे वर झाले. या कथेवरून लक्षात येते, भक्तीभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट, कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुध्द भक्ती, शुद्ध आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा.

Web Title: Adhik Maas 2020: What resolutions should be made in Adhik Maas ? What is the significance? know more.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.