Swami Smaran Din Shivratri Pradosh Vrat 2026: शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो । हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ मराठी नववर्षाच्या पहिल्या चैत्र महिन्याची सांगता होताना ३ व्रतांचा महासंयोग जुळून आलेला आहे. बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्रि आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. या दिवशी महादेव शिवशंकर, स्वामी महाराजांचे विशेष पूजन करावे, नामस्मरण करावे आणि काही प्रभावी उपाय करावेत, असे सांगितले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते. चैत्र महिन्यात ही दोन्ही व्रते एकाच दिवशी आलेली आहेत. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांचे पूजन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. तिन्हीसांजेला, दिवेलागणीला प्रदोष काळी प्रदोष व्रताचरण आणि पूजन करावे, असे सांगितले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत.
प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि पूजा विधी
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
स्मरण दिनी करायचा श्री स्वामी समर्थ पूजन विधी
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून शूचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात, ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. स्वामींना अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे स्वामींना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
३ व्रतात करायचे ३ पुण्य फलदायी उपाय
- शक्य असेल तर आवर्जून महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. स्मरण दिनी स्वामींच्या मठात जावे. स्वामींचे दर्शन घ्यावे.
- ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. किमान १०८ वेळा 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा जप करावा.
- महादेव शिवशंकराच्या प्रभावी मंत्रांचा आवर्जून जप करावा. स्वामी समर्थ महाराजांचा प्रभावी तारक मंत्र अवश्य म्हणावा.
- महादेव शिवशंकर यांना बिल्वपत्र, पांढऱ्या रंगाची फुले अवश्य अर्पण करावी. तर स्वामींचे पूजन करताना पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून अर्पण करावी.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : A rare coincidence on April 15, 2026: Pradosh, monthly Shivratri, and Swami Smaran Din fall together. Observe fasts, worship Shiva and Swami, chant mantras, offer flowers, and seek blessings for immense merit and spiritual growth.
Web Summary : 15 अप्रैल, 2026 को दुर्लभ संयोग: प्रदोष, मासिक शिवरात्रि और स्वामी स्मरण दिन एक साथ। व्रत करें, शिव और स्वामी की पूजा करें, मंत्रों का जाप करें, फूल अर्पित करें और अपार पुण्य और आध्यात्मिक विकास के लिए आशीर्वाद लें।