हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:43 IST2026-02-11T15:42:32+5:302026-02-11T15:43:48+5:30

हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या; परंतु एसपींनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला.

Video of installment fraud goes viral, police officers rush to 'manage' the case; Superintendent of Police takes 'attendance' | हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’

हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’

बीड : हप्ताखोरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड ग्रामीणचे ठाणेदार अशोक मुदिराज यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली असली, तरी आता हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंगळवारी (दि. १०) तक्रारदार आणि मुदिराज या दोघांनाही समोरासमोर बोलावून त्यांची कडक शब्दांत ‘हजेरी’ घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यात कारवाई अटळ असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुदिराज यांनी पाली परिसरातील एका हॉटेलचालकाकडे मासिक हप्त्याची मागणी केली होती. या संभाषणाचा व्हिडिओ पुराव्यासह अधीक्षकांकडे सादर झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या; परंतु एसपींनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला. मंगळवारी झालेल्या चौकशीत तक्रारदार हॉटेलचालकाचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असून, मुदिराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक साेमनाथ जाधव यांच्याकडे सध्या बीड ग्रामीणची धुरा आहे. यापूर्वी त्यांनाही कर्मचाऱ्याने लाच घेतल्याने नियंत्रण कक्षात घेतले होते.

कारवाईची टांगती तलवार
अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी अत्यंत गोपनीय आणि वेगाने सुरू आहे. मुदिराज यांना ठाण्यातून हटवून नियंत्रण कक्षात जमा केल्याने त्यांचे अधिकार काढले गेले आहेत. आता चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते की केवळ बदलीवर हे प्रकरण शांत केले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तक्रारदार हेदेखील वादात?
ज्या हॉटेलचालकाने तक्रार केली आहे, त्यांच्या हॉटेलवर यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसांनीच छापा मारला होता. यावेळी काही जोडपे येथे आढळले होते. त्यात पुढे काय कारवाई झाली, हे मात्र, पोलिसांनी दडपले होते. आता पुन्हा याच हॉटेलवाल्यानेच पैसे मागितल्याचा व्हिडिओ बनवून एसपींकडे दिला आहे. त्यामुळे मुदिराज यांच्यासोबतच आता हा हॉटेलवालाही वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

गजानन क्षीरसागर यांच्या चौकशीचे काय झाले?
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्यावर एका सराफा व्यापाऱ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. सुरुवातीला तक्रार देणाऱ्या व्यापाऱ्याने नंतर 'यू-टर्न' घेत माघार घेतली. मात्र, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्षीरसागर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करून चौकशी लावली होती. या घटनेला आता महिना उलटूनही चौकशीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांच्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने संभ्रम वाढला असून, या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खरे की खोटे लवकर कळेल
चौकशी सुरू झाली आहे. आम्हाला पोलिस अधीक्षकांनी चौकशीच्या अनुषंगाने बोलावले होते. माझ्यावरील आरोप खरे की खोटे, हे माझ्या जबाबात देईल.
अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष

चौकशी सुरू केली
माझ्याकडे चौकशी असून, ती सुरूदेखील केली आहे. चौकशीअंती जे निष्पन्न होईल, त्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला जाईल. आताच यावर काही बोलणे, उचित ठरणार नाही.
सचिन पांडकर, पोलिस अधीक्षक, बीड

Web Title : रिश्वत का वीडियो वायरल; पुलिस निरीक्षक जांच के दायरे में, पुलिस अधीक्षक का हस्तक्षेप।

Web Summary : रिश्वत के एक वीडियो के सामने आने के बाद पुलिस निरीक्षक मुदिराज का तबादला कर दिया गया। पुलिस अधीक्षक कांवत ने मुदिराज और शिकायतकर्ता होटल मालिक दोनों को पूछताछ के लिए बुलाया। जांच जारी है, जिससे निलंबन हो सकता है। निरीक्षक क्षीरसागर से जुड़ा एक पिछला मामला अनसुलझा है, जिससे सवाल उठ रहे हैं।

Web Title : Bribery video goes viral; police inspector investigated, superintendent intervenes.

Web Summary : A bribery video led to the transfer of Police Inspector Mudiraj. Superintendent Kanwat summoned both Mudiraj and the complainant hotelier for questioning. An investigation is underway, potentially leading to suspension. A previous similar case involving Inspector Kshirsagar remains unresolved, raising questions.