नुकसानीच्या पाहणीसाठी आमदारांनी सांभाळले ट्रॅक्टरचे स्टेरिंग, पण चिखलात पडले अडकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 19:12 IST2022-10-15T19:06:14+5:302022-10-15T19:12:56+5:30
जोरदार पाऊस आणि चिखलामुळे ट्रॅक्टर अडकल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांना काही काळ अडकून पडावे लागले.

नुकसानीच्या पाहणीसाठी आमदारांनी सांभाळले ट्रॅक्टरचे स्टेरिंग, पण चिखलात पडले अडकून
- नितीन कांबळे
कडा (बीड) :बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. आष्टी तालुक्यात तर सोलेवाडी, पांढरी येथे गुरूवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या भागात यात मोठ्या प्रमाणावर शेती आणि पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली. मात्र, एका ठिकाणी आ. आजबे यांचे ट्रॅक्टर चिखलात अडकले. यामुळे अधिकाऱ्यांसह आमदारांना भर पावसात चिखलात अडकून पडावे लागले होते.
ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आमदार बाळासाहेब आजबे, उपविभागीय अधिकार प्रमोद कुदळे, तहसीलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, यांच्यासह मंडळधिकारी, तलाठी गेले होते. याचवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सोलेवाडी येथील नदीला पाणी आले.
बीड: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे स्वतः ट्रॅक्टर चालवत शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. मात्र जोरदार पाऊस आणि चिखलामुळे ट्रॅक्टर अडकल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांना काही काळ अडकून पडावे लागले. pic.twitter.com/CzbrG69igd
— Lokmat (@lokmat) October 15, 2022
पाणी वाढत जात असल्याने तेथून मार्ग काढत शेतकऱ्यांना भेटीस जाने शक्य नव्हते. यावेळी तेथील ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेत स्वतः आमदार आजबे पुढे निघाले. सोबतचे अधिकारी देखील त्यात बसले. मात्र, काही अंतर पार करताच चिखलात ट्रॅक्टर अडकले. धोधो कोसळणारा पाऊस आणि चिखलात अडकलेले ट्रॅक्टर अशा परिस्थितीत आमदार आणि अधिकाऱ्यांना काही वेळ तसेच बसून राहावे लागले. काही वेळाने आमदारांनी आपले कसब दाखवत ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांसह आमदार पुढील पाहणीसाठी निघून गेले.