केजमध्ये दोन अपघातांत २ बळी; झारखंडचा मजूर खदानीत चिरडला, तर तरुणाला टिप्परने उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:16 IST2025-12-05T19:15:22+5:302025-12-05T19:16:07+5:30
केज तालुक्यात अपघातांची मालिका; हायवा आणि टिप्परच्या चालकांच्या निष्काळजीपणाने दोघांचा जीव घेतला

केजमध्ये दोन अपघातांत २ बळी; झारखंडचा मजूर खदानीत चिरडला, तर तरुणाला टिप्परने उडवले
- मधुकर सिरसट
केज (बीड): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एकाच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये झारखंड राज्यातील एका मजुराचा समावेश आहे. हे दोन्ही अपघात वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे झाले असून, केज पोलिसांनी संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
खदानीजवळ हायवाने मजुराला चिरडले
हा पहिला अपघात बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी शिवारातील योगिता स्टोन आणि खडी क्रेशर मशीन परिसरात घडला. झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यातील साहिल प्रवाज सखावत (वय २६) हा तरुण मजूर खदानीच्या भिंतीला लागून उभा होता. याचवेळी हायवाचा ( क्रमांक एम एच २० / ई जी ४०१२) चालक बाजीराव बापूराव फुंदे (रा. जीवाचीवाडी) याने आपला हायवा हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवला. हायवा थेट खदानीच्या भिंतीकडे गेल्याने साहिल प्रवाज हा भिंत आणि हायवा यांच्यामध्ये दाबला गेला, यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटनेनंतर मयत मजुराचे पार्थिव त्याच्या मूळ गावी रागडीह (झारखंड) येथे पाठवण्यात आले. त्याच्या वडिलांनी (हुसेन इस्माईल्मीयां सखावत) दिलेल्या फिर्यादीवरून हायवा चालक बाजीराव फुंदे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण हे तपास करत आहेत.
साडूच्या भेटीला निघालेल्या तरुणाला टिप्परची धडक
दुसरा अपघात गुरुवारी रात्री साडे आठ वाजता तांबवा शिवारातील विठ्ठलवाडी परिसरात घडला. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ब्राह्मवाडी येथील विलास दुबाजी खुराडे (वय ३२) हे आपल्या दुचाकीवरून कळंब येथील आपल्या साडूच्या भेटीला निघाले होते. तांबवा शिवारात टिप्पर क्रमांक एम एच ४४ - यु २७१४ च्या चालकाने निष्काळजीपणे टिप्पर चालवत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार विलास दुबाजी खुराडे यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच तालुक्यात २४ तासांत झालेल्या या दोन अपघातांमुळे केज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.