वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 06:38 PM2021-11-27T18:38:48+5:302021-11-27T18:44:10+5:30

दोन्ही संशयितांनी कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोप केला.

Two arrested from Nanded for threatening to blow up Vaidyanath temple by RDX | वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात

वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात

googlenewsNext

बीड/नांदेड : ५० लाख रुपये द्या अन्यथा परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांनी नांदेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  कथित ड्रग माफियाने विश्वस्तांना धमकीचे पत्र पाठवल्याने शुक्रवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, आज बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसराची कसून तपासणी केली.

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील  प्रभू वैद्यनाथ मंदिरास एका व्यक्तीने पत्र पाठवून ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. पन्नास लाख रुपये न दिल्यास  मंदिर उडवून देण्याच्या धमकीचे पत्र  शुक्रवारी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्या हातात पडले. लागलीच देशमुख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांनतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान बीडच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसरात पाहणी केली. तसेच बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. 

दरम्यान, पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. यावेळी दोघांनीही, पुढील दोन दिवसांत आमची कोर्टात महत्वाची तारीख आहे, यातूनच आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे सांगितले. कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही संशयितांनी केला. 

काय होते विश्वस्तांना आलेल्या पत्रात  
'आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची गरज आहे. या पत्रातील पत्त्यावर रक्कम पोहोच करावी,अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन', अशी धमकी कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली होती.

स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात ,कर्नाटक ,आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविक येत असतात .या ठिकाणी दररोज दर्शनासाठी  भाविकांची गर्दी होत आहे. वैद्यनाथ मंदिराची खाजगी सुरक्षा व्यवस्था व पोलिसांच्या चार  पोलिस नियुक्त केलेले आहे. परंतु वैद्यनाथ मंदिरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी असावी अशी मागणी  केली जात आहे तुळजापूरच्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिरात स्वतंत्र पोलीस चौकी करावी अशी मागणीही होत आहे

Web Title: Two arrested from Nanded for threatening to blow up Vaidyanath temple by RDX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.