"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:49 IST2025-07-16T12:46:58+5:302025-07-16T12:49:29+5:30
मयत महादेव मुंडे यांची पत्नी, आई-वडील आणि मुलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पेट्रोलच्या बाटल्या जप्त करत त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले.

"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
Beed Crime: परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक न करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. 'हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक आहे', अशा भावना व्यक्त करताना खासदार सुळे यांनी याकडे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परळीतील व्यापारी व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या घटनेला १८ महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींच्या अटकेसाठी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागे उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना आश्वसन देण्यात आले होते. पण, अटक झालेली नाही.
"कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरे झिजवावे लागतात"
या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "परळीतील महादेव मुंडे खूनप्रकरणी दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही यामध्ये एकाही मारेकऱ्यास गजाआड करण्यात आले नाही. तपासात दिरंगाई करण्यात येत असल्याचा मुंडे कुटुंबियांचा आरोप आहे. महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना गजाआड करावे या मागणीसाठी मुंडे कुटुंबियांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला."
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरे झिजवावे लागतात आणि शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक आहे. शासनाने तातडीने याबाबत लक्ष घालून या कुटुंबाशी संवाद साधणे आवश्यक आहे", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न
महादेव मुंडे प्रकरणाचा तपास समाधान कारक नसल्याचे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांचे आईवडील आणि मुलगा यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलीस धावल्या. त्यांच्याकडील दोन पेट्रोलच्या बॉटल पोलिसांनी हिसकावून घेतल्या. यावेळी पोलीस मुख्यालयाबाहेर पोलीस आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यात झटापट झाली.