बीडमध्ये थरार! गोळी लागली, मजूर जिवाच्या आकांताने धावला, हल्लेखोरांनी गाठून कोयत्याने तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:24 IST2026-01-07T16:23:52+5:302026-01-07T16:24:13+5:30
बीडमध्ये भर दुपारी गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये थरार! गोळी लागली, मजूर जिवाच्या आकांताने धावला, हल्लेखोरांनी गाठून कोयत्याने तोडले
बीड : शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणाऱ्या हर्षद तुळशीराम शिंदे (वय ३५, रा. हाऊसिंग कॉलनी, धानोरा रोड, बीड) या कंत्राटी मजुरावर गोळ्या झाडून काेयत्याने तोंडवर वार करीत निर्घृण खून करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हर्षद शिंदे सध्या बीड नगरपालिका येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरापासून हद्दवाढ झालेल्या अंकुशनगर भागातील साई-पंढरी लॉन्स व मंगल कार्यालयाच्या समोर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाइपलाइन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा हर्षद शिंदे व त्याचा एक अन्य सहकारी खोदून पाइपलाइनचे काम करत असताना त्या ठिकाणी विशाल संजय सूर्यवंशी दुचाकीवरून आला. त्याने बंदुकीमधून तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या चुकविल्या. मात्र, एक गोळी बरगडीत लागल्याने जीव वाचविण्यासाठी हर्दष जवळच असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमधील शेडच्या पाठीमागे लपला असता विशाल त्याचा पाठलाग करत त्या ठिकाणी गेला, हर्षदच्या तोंडावर वार करून खून करून पळून गेला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, बीड पाेलिस उपअधीक्षक पूजा पवार, शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे प्रवीणकुमार बांगर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी ठाण मांडून होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुरावे गोळा केले
पाइपलाइनसाठी पाच फुट खोदलेल्या खड्ड्यामध्ये दोन रिकामे कार्टेज आढळून आले. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून गोळ्यांसह इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपीचा शोध सुरू
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत म्हणाले की, घटनास्थळावरून बंदुकीचे दोन रिकामे कार्टेज आढळून आले. आरोपी विशाल सूर्यवंशी याने झाडलेल्या गोळ्या चुकवून हर्षद शिंदे याने पळ काढला असावा आणि हर्षद याचा पाठलाग करून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आरोपीचा शोध पोलिस टीमने सुरू केला आहे.