बनावट लग्न करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:30 IST2021-03-18T18:30:20+5:302021-03-18T18:30:38+5:30
प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले होते.

बनावट लग्न करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी
आष्टी (जि. बीड) : तरुणांसोबत बनावट विवाह करून चार आठ दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीतील तिघांना १७ मार्च रोजी आष्टी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिराळ येथील तरूणाचे लग्न लावून नंतर खंडणी मागितल्याचा प्रकार या तरुणाच्या तक्रारीवरून उघड झाला होता. त्यानुसार आष्टी पोलिसांनी सोनाली गणेश काळे (रा. लातूर), अजय महारुद्र चवळे (रा. खंडापूर, जि. लातूर), रामा काशिनाथ बडे (रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना अटक केली होती.
प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले होते. या रॅकेटचा शोध सुरू आहे. याकामी पोलीस पथक १६ मार्च रोजी लातूरला गेले होते. तेथून चौकशीसाठी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. परंतु चौकशी करुन सोडून देण्यात आले. दरम्यान, या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी आष्टी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोह बन्सी जायभाये हे करीत आहेत.