"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:02 IST2025-11-26T11:00:29+5:302025-11-26T11:02:46+5:30
Gauri Palve: अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे हा कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे. ही घटना समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी गौरी पालवे यांच्या आईवडिलांची भेट घेतली.

"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
Gauri Palve Anant Garje News: "मला गौरीच्या त्रासाबद्दल माहितीच नव्हती. नाहीतर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सागते की, या प्रकरणात मी कोणालाही फोन केलेला नाही. कोणालाही वाचण्याचा प्रयत्न केला नाही", अशा भावना कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. गौरी यांच्या आईवडिलांची पंकजा मुंडे यांनी शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात जाऊन भेट घेतली. पालवे कुटुंबीयांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर त्यांच्या मुलीला झालेल्या त्रासाची व्यथा मांडली आणि न्याय द्या अशी मागणी केली.
माझ्याकडे दहा पीए आहे, त्यांच्या घरात...
पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला गौरीच्या त्रासाबद्दल काहीच माहिती नाही. मला माहिती असते, तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि गोपीनाथ मु्ंडे यांची शपथ घेऊन सांगते की, मी या प्रकरणात कोणलाही कॉल केला नाही. मी कुणाला वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. माझ्याकडे दहा पीए आहेत. पगारी नोकरांच्या घरात काय चाललंय, हे कसे माहिती होईल. हे असे काही आहे, ते मला नंतर समजलं."
माझ्या मुलालाही पाठीशी घातले नसते -पंकजा मुंडे
"मला कल्पना असती, तर मी अनंतच्या कानाखाली लावल्या असत्या. मी तर कळलं तेव्हा खालीच बसले. माझ्याकडे गणपतीला आले होते. नटून-थटून, इतका सुंदर जोडा. माझा मुलगा असा वागला असता, तर मी त्यालाही पाठीशी घातले नसते", असे पंकजा मुंडे गौरी पालवे यांच्या आईवडिलांना म्हणाल्या.
"पोलीस ज्या केसमध्ये पुरावा नाही, त्या प्रकरणाचाही छडा लावतात. पृथ्वीवर अनंत गर्जेची बाजू कोण घेत आहे, मला सांगा, कोण त्याच्यासोबत आहे? पोलिसांना तपास तर करू दिला पाहिजे ना. दोन दिवसात काय होणार आहे. पोलीस सर्व तपास करतील. मी पोलिसांना एकही कॉल केलेला नाही. तुमच्या घरात काय चालू आहे, मला काही माहिती नव्हते", असेही पंकजा मु्ंडे म्हणाल्या.
तुम्हाला सगळं माहिती असूनही...
पंकजा मुंडे म्हणाल्या, "तुम्हाला एवढं माहिती असूनही तुम्ही काही करू शकले नाहीत. मग आम्हाला तर माहितीच नव्हते. कोण एकमेकांना वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न विचारतं. सज्जन माणूस विचारतो का? जरा धीर धरा. मला कसं वाटेल आपल्या लेकीसोबत असं व्हावं?", अशी हळहळ पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.