पुढारी, अधिकाऱ्यांचे फोटोसेशन संपलं; रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही; लिंबागणेशचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:56 IST2025-09-27T17:55:34+5:302025-09-27T17:56:15+5:30
'पुढारी-अधिकारी फक्त फोटो काढून जातात'; रस्ता खचल्याने लिंबागणेशच्या ग्रामस्थांचा संताप

पुढारी, अधिकाऱ्यांचे फोटोसेशन संपलं; रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही; लिंबागणेशचा संपर्क तुटला
लिंबागणेश (दि.२७) : बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड रस्ता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचून वाहतूक ठप्प झाली आहे. दुध-दुभते, भाजीपाला, शेतीमाल बाजारात नेणे, तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार संदिप क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्यासह गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी साइट व्हिजिट करून फोटोसेशन केले, मात्र १३ दिवस उलटून गेले तरी दुरुस्तीची कामे सुरूच झाली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः वाहून गेलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
'पुढारी आणि अधिकारी फक्त फोटो काढून जातात'; रस्ता खचल्याने बीड तालुक्यातील लिंबागणेशच्या ग्रामस्थांचा संताप, रास्ता रोकोनंतरही आश्वासन हवेत #beed#MarathwadaRainpic.twitter.com/zI4TipuzfY
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 27, 2025
ग्रामस्थांचा रोष
मनोहर वाणी, सखाराम घोलप, अर्जुन घोलप, संतोष वाणी, विवेक बागल, विशाल घोलप, प्रकाश ढवळे, जनार्दन वाणी, रमेश घोलप, वैजनाथ वाणी, महावीर वाणी आदी ग्रामस्थांनी “पुढारी आणि अधिकारी फक्त फोटो काढून जातात, पण रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत” अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.
रस्तारोकोनंतरही आश्वासन हवेत
५ दिवसांपूर्वी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार संदिप क्षीरसागर, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी जायभाये, तलाठी गणपत पोतदार व ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी “२ दिवसांत तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करू” असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन फक्त कागदावरच राहिले असून, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.