ऐन निवडणुकीत बीड भाजपत मुंडे-धसांमध्ये समन्वयाचा अभाव; कार्यकर्त्यांची राजकीय कोंडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:25 IST2025-11-21T16:22:49+5:302025-11-21T16:25:10+5:30
उमेदवारी वाटपापासून ते निवडणूक रणनीतीपर्यंत सुरेश धस थोडे लांबच

ऐन निवडणुकीत बीड भाजपत मुंडे-धसांमध्ये समन्वयाचा अभाव; कार्यकर्त्यांची राजकीय कोंडी!
बीड : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दोन प्रमुख नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे मोठी राजकीय कोंडी झाली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी आणि स्टार प्रचारकाची जबाबदारी आहे, तर आमदार सुरेश धस हे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर एकमत होत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
नेत्यांच्या निवडणुकीत जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपल्या निवडणुकीत नेत्यांच्या राजकीय वादाचा फटका बसण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीत नेमके कोणाचे नेतृत्व स्वीकारावे, या पेचात भाजप कार्यकर्त्यांची अक्षरशः ‘राजकीय कोंडी’ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी जातीय राजकारणाचाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
रणनीतीत समन्वयाचा अभाव
पंकजा मुंडे यांची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून धोरणे ठरवणे आणि प्रचाराची दिशा देणे ही आहे. तर, सुरेश धस हे जिल्ह्याचे प्रमुख असले तरी, उमेदवारी वाटप किंवा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटासोबत अनेक नगरपालिकेत भाजपचे स्थानिक नेते थेट लढत देत आहेत. एका बाजूला युतीधर्म पाळण्याची चर्चा, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्तरावरची तुंबळ लढाई यामुळे धस आणि मुंडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते हताश
नेत्यांमधील मतभेदाचा थेट फटका स्थानिक कार्यकर्त्यांना बसत आहे. उमेदवारी मिळविण्यापासून ते विरोधात थांबलेल्या बंडखोरांना थंड करण्यासाठी त्यांना स्वतःच धावपळ करावी लागत आहे. अगोदरच स्थानिकची अंतर्गत गटबाजी आणि त्यात आता वरिष्ठ नेत्यांचे राजकीय वाद यांची भर पडल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते हताश झाले आहेत.
परळी वगळता सर्वत्र विरोध
या गटबाजीमुळे भाजपची महायुती केवळ परळी नगरपालिकेतच टिकली आहे, जिथे भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती करून लढत आहेत. मात्र, बीड, अंबाजोगाई, गेवराई, धारूर, माजलगाव येथे आघाडी आणि पक्षाच्या चिन्हावर थेट निवडणुका होत आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतच नेत्यांची गटबाजी उफाळून आल्याने याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.