कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार, बीड जिल्ह्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:06 IST2026-04-25T17:05:30+5:302026-04-25T17:06:44+5:30
आरोग्य मंत्र्यांच्या फोननंतरही कारवाई होणार का? विडा आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार, बीड जिल्ह्यातील प्रकार
- सोमनाथ खताळ
बीड :बीड जिल्ह्याचा कणा असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी असलेली परवड काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. कष्टाचे डोंगर उपसून ऊसतोडीचा हंगाम संपवून परतलेल्या महिला मजुरांना आता सरकारी दवाखान्यातही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.
बेड १० आणि रुग्ण १५; नियोजन शून्य !
२२ एप्रिल रोजी विडा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, आरोग्य केंद्रात केवळ १० बेड उपलब्ध होते. उर्वरित पाच महिलांना शस्त्रक्रियेसारखी गंभीर प्रक्रिया पार पडल्यानंतर चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. संसर्गाचा मोठा धोका असतानाही, या महिलांना अशा असुरक्षित स्थितीत ठेवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.
प्रशासनाकडून अजब 'सारवासारव'
या प्रकरणाची माहिती पसरल्यानंतर प्रशासनाने अजब तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. "त्या महिलांनीच आम्हाला जमिनीवर उपचार चालतील, असे सांगितले होते," असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन गायकवाड यांनी केला आहे. मात्र, रुग्ण असुविधा असतानाही उपचार करा म्हणत असेल, तर डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रुग्णाला धोकादायक स्थितीत ठेवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे.
आरोग्य मंत्र्यांकडूनही विचारणा
या प्रकाराची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दखल घेतली. त्यांनी थेट महिला रुग्णांशी संवाद साधला. मात्र, त्याआधीच या महिलांना प्रशासनाकडून "काय बोलावे" याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार झाली नसल्याची चर्चा आहे. आता आबिटकर कारवाई करणार की, डॉक्टरांच्या खुलाशावर समाधान मानून त्यांना पाठीशी घालणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महिलांनीच आग्रह धरला
१५ पैकी ५ महिलांना गादी टाकून उपचार केले. संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली. महिलांनीच कामाला जायचे असल्याने आग्रह धरला होता. आरोग्य मंत्री यांनीही फोनवरून महिला रुग्णांशी संवाद साधला आहे.
-डॉ. रोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, विडा ता. केज.