Beed Crime: ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड, महत्वाचे दस्तऐवज पेटवून दिल्याने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:24 IST2025-11-15T14:21:44+5:302025-11-15T14:24:27+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Beed Crime: ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड, महत्वाचे दस्तऐवज पेटवून दिल्याने खळबळ!
- नितीन कांबळे
कडा (बीड): अज्ञात व्यक्तीने दारूच्या नशेत शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत महत्त्वाचे दस्तऐवज पेटून दिल्याची खळखबळ घटना सुलेमान देवळा येथे उघडकीस आली आहे. आगीत ४० ते ५० रजिस्टर व महत्वाचे दस्तऐवज,फाइल जळून खाक झाले आहेत. कोणी व कोणत्या कारणांसाठी हे कृत्य केले याबाबत अद्याप अधिकृत माहिती कळू शकली नाही.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील एका दारूने झिंगलेल्या व्यक्तीने शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान हातात कुर्हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून महत्त्वाचे दस्तऐवज अस्ताव्यस्त करत पेटवून दिले. ४० ते ५० रजिस्टर व महत्वाचे दस्तऐवज,फाइल जळून खाक झाले आहेत, अशी माहिती गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना दिली.
दरम्यान, आज ग्रामविकास अधिकारी मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव सुखदेव भादवे, सचिन भगवान खोरदे, नवनाथ,एकनाथ भोजे या पंचाच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मुळीक यांनी सांगितले.
सरपंचाकडून आर्थिक पिळवणूक
येथील सरपंच हे वैयक्तिक कामासाठी व घरकुलाच्या हप्त्यापोटी पैशाची मागणी केल्याशिवाय हप्ता देत नाहीत. त्याच्याकडून सातत्याने मनमानी कारभार सुरू आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा न झाल्यामुळे, आपली व्यथा मांडायची कोणापुढे या भावनेतून कदाचित एखाद्या ग्रामस्थांनी हे गुन्हेगारी घटना घडली असावी, असे समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी सांगितले.