समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 17:20 IST2025-01-18T17:20:02+5:302025-01-18T17:20:30+5:30
नादुरुस्त ट्रॉली ठरली काळ; दुचाकी धडकून पिकांना पाणी देऊन परतणाऱ्या सरपंच पुत्राचा मृत्यू

समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : शेतातील पिकाला पाणी देऊन घराकडे परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ढाकेफळ शिवारात झाला. यात सुभाष रतन अंधारे ( ४० ) यांचा जागीच मृत्यू झाला. ते ढाकेफळ येथील सरपंच रतन अंधारे यांचे पुत्र होते.
ढाकेफळ शिवारातील शेतातील पिकाला पाणी देऊन सुभाष रतन अंधारे शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घराकडे परतत होते. यावेळी शिवरा लगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर एक नादुरुस्त ट्रॅक्टर व ट्रॉली दुचाकीच्या लेनवर उभी होती. समोरून आलेल्या वाहनाच्या प्रकाश झोतामूळे अंदाज न आल्याने सुभाष समोर उभ्या ट्रॉलीवर धडकले. धडक जोरदार असल्याने गंभीर जखमी सुभाष अंधारे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात मृताचे वडील रतन अंधारे यांच्या खबरीवरून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार संपत शेंडगे हे करीत आहेत. सुभाष अंधारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुभाष अंधारे यांच्या पार्थिवावर ढाकेफळ येथे शनिवारी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.