Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:17 IST2025-12-24T16:17:14+5:302025-12-24T16:17:45+5:30

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरण; वाल्मीक कराडसह सात आरोपींवर दोषारोप निश्चित; जिल्हा न्यायालयात होणार ८ जानेवारीला पुढील सुनावणी

Santosh Deshmukh's murder case: Conviction of accused after 21 hearings; Know the complete sequence of events | Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

बीड : राज्यभरात गाजलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील वाल्मीक कराडसह सातही आरोपींवर बीड येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने मंगळवारी दोषारोप निश्चित केले. त्यामुळे या खून प्रकरणास आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

बीड जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ‘फॉरेन्सिककडे असलेल्या लॅपटॉपमधील डेटाची प्रत मिळेपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये’ आणि ‘चार्ज फ्रेम करण्यापूर्वी अतिरिक्त पुरावा देण्यात यावा’ अशी मागणी बचाव पक्षाने केली. तसेच आरोपी प्रतीक घुले याच्या नवीन वकिलाने पेन ड्राईव्हमधील माहिती पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. वारंवार वकील बदलणे आणि वेळकाढू धोरण अवलंबिण्यावरून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘प्रत्येक तारखेला असं व्हायला नको, वारंवार वकील बदलून तीच ती कारणे दिली जात आहेत,’ अशा शब्दांत न्यायालयाने आरोपींना सुनावले. दरम्यान, सर्व आरोपींनी आरोप नाकारल्यामुळे आता या प्रकरणाची नियमित सुनावणी आणि साक्षीदारांच्या साक्ष घेण्याची प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सात आरोपींवर काय आहेत आरोप?
न्यायालयाने आरोपींवर असलेले आरोप वाचून दाखवले. खंडणी मागणे, खुनाचा कट रचणे, खून करणे, धमकाणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, पुरावे नष्ट करणे, मकोका कायद्यांतर्गत संघटित गुन्हेगारी करणे, अशा आरोपांचा समावेश आहे.

कराड बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले
मकोका न्या. व्ही. एच. पाटवदकर यांनी ‘तुम्हाला तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का?’ असे सर्व आरोपींना विचारले, तेव्हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सर्व सातही आरोपींनी ‘आरोप मान्य नसल्याचे’ सांगितले. या दरम्यान, आरोपी वाल्मीक कराड याने त्याचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्या. पाटवदकर यांनी आरोपी कराड यास केवळ फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये उत्तर देण्यास सांगितले.

आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसला
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, न्यायालयाने वाल्मीक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आजही पुन्हा हे आरोप निश्चितीची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन म्हणजेच उशीर करणे आणि खटला उलथवून लावणे, असे प्रयत्न होते, त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसलेला आहे. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारले की तुमच्याविरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यावर सर्व आरोपींनी आरोप मान्य नाहीत, असे सांगितले आहे. न्यायालयाने त्याकरिता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवले असून, जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाला सुरुवात होईल.

थोडक्यात घटनाक्रम: 
६ डिसेंबर २०२४ : मस्साजोगमध्ये वाद
९ डिसेंबर २०२४ : संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून
१० डिसेंबर २०२४ : प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांना अटक
१८ डिसेंबर २०२४ : विष्णू चाटे अटक
३१ डिसेंबर २०२४ : वाल्मीक कराड ‘सीआयडी’ला पुण्यात शरण
४ जानेवारी २०२५ : सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक
२७ फेब्रुवारी २०२५ : न्यायालयात दोषारोपपत्र दाखल (८० दिवसांत)
२३ डिसेंबर २०२५ : सर्वच सात आरोपींवर दोष निश्चीती
२१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती

Web Title : संतोष देशमुख हत्याकांड: 21 सुनवाई के बाद आरोप तय।

Web Summary : बीड कोर्ट ने संतोष देशमुख हत्याकांड में सात आरोपियों पर आरोप तय किए। बचाव पक्ष की रणनीति से मुकदमे में देरी हुई। अगली सुनवाई 8 जनवरी, 2026 को। आरोपियों ने आरोपों से इनकार किया।

Web Title : Santosh Deshmukh murder case: Charges framed after 21 hearings.

Web Summary : Beed court frames charges against seven accused in Santosh Deshmukh murder case. Trial delayed by defense tactics. Next hearing January 8, 2026. Accused deny charges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.