वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:52 IST2024-12-30T15:48:31+5:302024-12-30T15:52:22+5:30
वाल्मिक कराड याला पुण्यातून सीआयडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त काही वेबसाइट्स आणि बीडच्या स्थानिक दैनिकांनी प्रकाशित केले होते.

वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...
Walmik Karad Beed: पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा फरार आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांवर सर्वच स्तरातून दबाव असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीची विविध पथके प्रयत्नशील आहेत. अशातच आज मध्यरात्री वाल्मिक कराड याला पुण्यातून सीआयडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त काही वेबसाइट्स आणि बीडच्या स्थानिक दैनिकांनी प्रकाशित केले होते. परंतु या माहितीला तपास यंत्रणांकडून दुजोरा देण्यात आला नसून सदर वृत्त निराधार असल्याची माहिती आहे.
बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढत सरपंच हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींसह वाल्मिक कराड याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. तसंच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही आता मोर्चे काढत अशी मागणी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे तपास यंत्रणानीही आपला वेग वाढवत कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली असून वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, कराड याची पत्नी मंजिली कराड यांनाही सीआयडीने चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. त्यामुळे आता वाल्मिक कराडसमोर आत्मसमर्पणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे बोलले जाते. अशातच आज मध्यरात्री त्याला अटक झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलं नसून सीआयडीच्या विविध पथकांकडून शोध सुरू असल्याचे समजते.
कराडसह आरोपींच्या शोधासाठी नऊ पथके तैनात
वाल्मिक कराडसह चार आरोपींचे बँक वाल्मीक कराड खाते सीआयडीने फ्रीज केले आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात तपास करत आहेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येसह दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. त्यानंतर सीआयडीने तपासाची गती आणखी वाढविल्याचे दिसत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींचे मृतदेह सापडल्याचा व्हॉइस मेसेज अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठविला होता. त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.