बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? कारागृह अधीक्षकांची सचिवांकडे कैद्यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:25 IST2025-10-08T16:20:55+5:302025-10-08T16:25:01+5:30
'धर्मांतर केल्यास गुन्ह्यातून दोषमुक्त करू'! बीड जेलमध्ये कैद्यांना आमिष, वकिलांचा खळबळजनक दावा

बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? कारागृह अधीक्षकांची सचिवांकडे कैद्यांची तक्रार
बीड : येथील जिल्हा कारागृहात तीन कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यांना पैसे, गाडी आणि बंगल्याचे आमिष दाखविण्यात आले. यासंदर्भात या तीनही कैद्यांनी आपल्यामार्फत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव, अपर पोलिस महासंचालकांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याची माहिती कैद्यांचे वकील ॲड. राहुल आघाव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांचाही छळ केल्याचा दावा त्यांनी केला. सोमवारीच भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनीही असेच आरोप केले होते.
अमोल भावले, महेश रोडे, मोहसीन पठाण हे बीडच्या कारागृहात विविध गुन्ह्यांत बंदी आहेत. येथील अधीक्षक आपल्यावर दबाव आणत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच महापुरुष, संत, महंतांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलचे वाक्य लिहिले. धर्मांतर करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही शासकीय अधिकारी असलेले अधीक्षक पेट्रस गायकवाड हेच याचे उल्लंघन करीत आहेत. त्यांचे निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणीही ॲड. आघाव यांनी केली आहे. गायकवाड यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.
धर्म प्रचारक कशासाठी येतात?
गायकवाड हे कारागृहात असताना संजय गायकवाड नावाचे धर्म प्रचारक अनेकदा कारागृहात आल्याचा दावा ॲड. आघाव यांनी केला. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर हा सर्व प्रकार उघड होईल. हिंदूंना ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न अधीक्षक गायकवाड यांच्याकडून होत आहे. त्यामुळेच हिंदूंच्या भजनासह इतर सर्व प्रथा, परंपरा त्यांनी बंद पाडल्या, असा आरोपही त्यांनी केला.
‘जेवणातून विषबाधा करून मारू’
माझ्या पक्षकार असलेल्या बंद्यांना पेट्रस गायकवाड यांनी जेवणातून विषबाधा करून मारण्याची धमकीही दिली आहे. तसेच त्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपये देण्यासह इतर आमिष दाखविण्यात आले. यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ॲड. आघाव म्हणाले.
‘न्यायालयातून दोषमुक्त करू’
जे हिंदू कैदी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मात येतील त्यांना दाखल गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याचे आमिष पेट्रस गायकवाड देतात. एवढेच नव्हेतर, न्यायालयातही आपली ओळख असून, आपण सर्व काही मॅनेज करू, असेही कैद्यांना सांगत असल्याचे ॲड. आघाव यांनी सांगितले. या सर्व प्रकरणात सध्या ई-मेलद्वारे, तर बुधवारी कारागृह प्रशासनाचे महासंचालक, महानिरीक्षक यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
गायकवाडवर कारवाई का होत नाही?
पेट्रस गायकवाड हे वादग्रस्त आहेत. यापूर्वी जळगावमध्ये त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून, निलंबितही झाले होते. बीडमध्ये आल्यावरही त्यांच्या काळात कैद्यांजवळ मोबाइल, गांजा सापडल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यातच अवैध वृक्षतोड, कैद्याकडून वाहन धुऊन घेतल्याचेही समोर आले होते. एवढे गंभीर प्रकार घडूनही कारागृह प्रशासन गायकवाड यांना पाठीशी का घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ॲड. आघाव यांनी यावरही लक्ष वेधले.