विरोधक, सत्ताधाऱ्यांनीही मुंडेंना घेरले; मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील मोर्चात व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:03 IST2024-12-29T08:02:50+5:302024-12-29T08:03:58+5:30
आता यात सत्ताधारी आमदारांनीही सूर मिसळला आहे. शनिवारी बीडमध्ये झालेल्या मूक मोर्चातून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी केली, तर भाजपचे सुरेश धस यांनीही अनेक गौप्यस्फाेट करत मंत्री मुंडे यांना कोंडीत पकडले आहे.

बीडमध्ये आयोजित मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले देशमुख कुटुंबीय...
बीड : मस्साजोग सरपंच हत्या, दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा दावा करत सत्ताधारी, विरोधकांकडून अटकेची मागणी केली जात आहे. आता यात सत्ताधारी आमदारांनीही सूर मिसळला आहे. शनिवारी बीडमध्ये झालेल्या मूक मोर्चातून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी केली, तर भाजपचे सुरेश धस यांनीही अनेक गौप्यस्फाेट करत मंत्री मुंडे यांना कोंडीत पकडले आहे.
कृषिमंत्री पद भाड्याने दिले : आमदार धस
आमदार धस म्हणाले, फड नावाचा व्यक्ती वाहन पूजा करताना हवेत गोळ्या झाडतो. यांना कोणी परवाना दिला. आता जिल्ह्यात असलेले १३०० शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात चौकशी व्हावी. पंकजाताई १२ डिसेंबरला तुम्ही बीडमध्ये आला होतात. मग संतोषच्या घरी का गेला नाहीत?
परळीत १ रुपयाही न भरता ५०० ट्रक राखेचे चालतात. २०१४ ते २०१९ तुम्ही मंत्री होतात, तेव्हा हे का बंद केले नाही? असा सवालही आमदार धस यांनी पंकजा मुंडे यांना विचारला. या सर्व घटनांमागे आका आहे, असा आरोप त्यांनी केला.
कृषी खाते, कृषिमंत्रीपदही आकाला भाड्याने दिले. हार्वेस्टरला ४० लाख रुपये केंद्राची सबसीडी आहे. परंतु, त्यातील ९ लाख रुपये कराडला दिल्याशिवाय फाईल मंजूरच होत नाही, असेही ते म्हणाले. जमीन घोटाळ्यासंदर्भातील काही गंभीर आरोपही त्यांनी केले.
फाशी व्हावी : मुंडे
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी आधीपासून ठाम भूमिका आहे. आरोपी कोणाच्या कितीही जवळचा असला तरी शासन व्हावे यासाठी आणि फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावे यासाठी बारा डिसेंबरला सर्वात आधी मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी मी केलेली आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
चौकशीस सामोरे जा : सोनवणे
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन, चौकशीला सामोरे जावे. तुम्हाला आमचे मुडदे पाडायला मंत्रिपद हवे आहे का? असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला.
‘दमानिया यांनी पुरावे द्यावे’
बीड/पुणे : तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी बीडमध्ये सांगितले. धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. तर, दमानिया यांनी बेछूट आरोप करू नये. माहिती असल्यास पोलिसांना द्यावी, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी हल्लाबोल केला.
...तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन : जरांगे पाटील
- समाजाच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहा. सत्ताधारी व विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, अशी मागणी करा.
- आम्ही समाज म्हणून तुमच्या मागे आहोत. आरोपींना अटक झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाची तयारी करा, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
...तर मी पालकत्व घेईन : संभाजीराजे छत्रपती
- धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, हे तेव्हाच सांगितले होते. जर का आता त्यांना पालकमंत्रिपद दिले, तर मी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारेन, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
- सभागृहात हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दोषींना सोडणार नाही. मात्र, अद्याप आरोपींना अटक झालेली नाही, असे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
- धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास या प्रकरणी न्याय मिळणार नाही. त्यामुळे निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी आमदार प्रकाश साेळंके यांनी यावेळी केली.