Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 23:39 IST2025-10-17T23:35:16+5:302025-10-17T23:39:38+5:30
OBC Maha Elgar Sabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या ओबीसी महा एल्गार सभेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.

Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
वडीगोद्री (जालना ): मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांकडून होत असलेल्या विरोधानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या ओबीसी महा एल्गार सभेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. ही सभा ओबीसीची नसून, बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट जातीची सभा होती, असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे.
'मराठ्यांना आता ताकद दाखवावी लागेल'
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आता आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मराठा ५०-५५ टक्के आहे, त्याच्या आकडेवारीवर कोण लक्ष देत? आता बीड जिल्ह्यातील मराठ्यांना ताकद दाखवावी लागणार आहे. मराठे कोणाला भीत नाहीत. यांना तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल." बीड जिल्हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक करून दाखवावा, असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले.
सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, भुजबळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॅमेज' करण्याचे काम करत आहेत. "सरकारला बदनाम करण्यासाठी ते काम करत आहेत. आमचे शिंदे साहेब आणि अजित दादा यांना बदनाम करण्याचे हे काम आहे. परळीचे टोळी चालवणाऱ्याने हे केले, यात अजित दादांचे काही नाही."
धनंजय मुंडेंना इशारा
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी थेट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रकरणांचा उल्लेख केला. "संपलेल्या माणसावर बोलू नये. मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही. करुणा मुंडे मला भेटायला आली होती, तिने मला सांगितले, तू माझ्या नादी लागू नको." असा इशारा त्यांनी धनंजय मुंडेंना दिला.
धनंजय मुंडेंनी भुजबळांच्या नादी लागू नये
जरांगे यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर सर्वात गंभीर आरोप केले. जरांगे म्हणाले की, "हा जातीय दंगली घडवून आणणार आहे. गृहमंत्री यांनी त्याची जामीन रद्द करावी." तसेच, धनंजय मुंडेंनी भुजबळांच्या नादी लागू नये, कारण तो जातीचा नेता आहे, ओबीसीचा नेता नाही, असा सल्ला जरांगे यांनी दिला.