कडा (जि. बीड) : प्रेम प्रकरणातून डांबून केलेल्या मारहाणीत जालना जिल्ह्यातील युवकाचा मृत्यू झाला होता. यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. आष्टी पोलिसांनी १२ तासांत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. अन्य चौघांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.
विकास अण्णा बनसोडे (२३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) हा आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे काही वर्षांपूर्वी ट्रक चालक होता. १२ मार्चला तो मित्रासह पिंपरीला आला. आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून दोरी व वायरने मारहाण केली. १५ मार्चला रात्री त्याचा मृत्यू झाला होता.
‘सरकार न्याय द्या, आरोपींना फाशी द्या’ छत्रपती संभाजीनगर : ‘माझ्या भावाची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सरकारने न्याय द्यावा,’ अशी भावना विकास बनसोडे याच्या भावाने व्यक्त केली. विकासचे सोमवारी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाले.
शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव शाॅकमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. घाटीत विकासचा भाऊ आकाश व नातेवाईक उपस्थित होते. भावाच्या खुनात मलाच फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, असेही आकाशने यावेळी सांगितले.
सहा जणांना सुनावली २४ मार्चपर्यंत कोठडीभाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संजय भवर, सुशांत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.