Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:43 IST2025-10-02T15:42:29+5:302025-10-02T15:43:02+5:30
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला.

Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. तब्येत बरी नसताना देखील मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्याला हजेरी लावत जनतेला संबोधित केलं. हजारोंच्या संख्येने लोक दसऱ्या मेळाव्याला उपस्थित होते. याच दरम्यान "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..." आहे असं म्हणत भावनिक साद घातली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आणि धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. "विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सर्वच जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला बोलायला खूप त्रास होत आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी माझ्या शेतकऱ्यांना मिळावी."
"मी थोड्या दिवसांचा पाहुणा"
"खूप वेदना आहेत, शरीराला त्रास होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच, सहा महिन्यांपूर्वी एक गोष्टी सांगितली होती. प्रत्येकाला सांगितली होती. मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या."
"जीआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली"
"मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं पाहायचं आहे. मागे कोणी हटू नका. कुणी मागे सरकू नका. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आता साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली, जीआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी थोड्या दिवसांचा पाहुणा असो की लय दिवसांचा. मला चिंता राहिलेली नाही" असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.