पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:11 IST2025-07-04T13:11:21+5:302025-07-04T13:11:46+5:30

महादेव मुंडे खून प्रकरणाला नवे वळण; पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल

Mahadev Munde Murder Case: Killed husband and placed a piece of meat in front of Walmik Karad; Why is there no investigation of Bala Bangar? | पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

बीड : पाटोदा येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महादेव मुंडे यांचा खून करून आरोपींनी माझ्यासमोर मांसाचा तुकडा वाल्मीक कराड याच्यासमोर टेबलवर आणून ठेवला होता, असा आरोप केला होता. यावर महादेव मुंडे यांच्या पत्नीने पोलिसांवर आरोप करत यात बाळा बांगर हे साक्षीदार असून, त्यांचा जबाब का घेतला जात नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. आरोपींना अटक न केल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा ज्ञानेश्वरी यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिला आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले आहे.

परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात २२ ऑक्टोबर २०२३ मध्ये महादेव मुंडे यांच्या खुनाची घटना घडली होती. तब्बल १८ महिने उलटूनही या खून प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. दरम्यान, ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मार्च २०२५ मध्ये बीड येथे उपोषण करताना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आरोपी निष्पन्न झाल्याचे सांगितले होते; परंतु अजूनही आरोपीस अटक झाली नाही. बीडचे पोलिस अधिकारी आरोपींची पाठराखण करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला. दरम्यान, बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत ‘महादेव मुंडे यांचा मांसाचा तुकडा आरोपींनी वाल्मीक कराड यांच्या टेबल समोर आणून ठेवला होता’ असा खुलासा केला. ते या प्रकरणात साक्ष देण्यासाठी आणि तक्रार देण्यास तयार असून, पोलिसांनी तातडीने त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

एसपी देतात तारीख पे तारीख
पोलिस अधीक्षकांना अनेकदा भेटले. परंतु, त्यांच्याकडून केवळ तारीख पे तारीख दिली जात आहे. १८ महिने होऊनही तपास लागत नाही, पोलिस करतात काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधिकारी सानप यांचे सीडीआर तपासून त्यांनाही यात सहआरोपी करावे, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.

तपास अधिकारी बदलले
या प्रकरणात अनेक तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. घटनेनंतर परळी पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यानंतर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी, तेथून गेवराईच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तपास दिला. त्यानंतर आता हा तपास केजच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या मदतीला मध्यंतरी एक पथकही दिले होते. परंतु, त्यांनाही यात आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही.

Web Title: Mahadev Munde Murder Case: Killed husband and placed a piece of meat in front of Walmik Karad; Why is there no investigation of Bala Bangar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.