'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:54 IST2024-12-27T15:49:03+5:302024-12-27T15:54:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांनी अजूनही काही आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक करण्याची मागणी वाढली आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे.
'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार आहे, तसेच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था समाधानकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मंत्री धनंजय मुंडे यांना विरोध सुरू असल्याचे दिसत आहे.
"बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती समाधानकारक नाही. वाळूचा उपसा, मद्य विक्री या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात पैसा काही जणांच्या हातात येतो. यातूनच खंडणी मागणे. खंडणीतून खून करणे हे प्रकार होत आहेत. बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन किंवा इतर खात्यावर एक प्रकारे दबाव ठेऊन काम केले जात आहे. अधिकारी लोक, पोलिस प्रशासन यांचे बटीक असल्याचे करत आहेत. कोणावरही गुन्हे दाखल केले जात आहेत, कुणालाही अटक केली जात आहे, असा आरोपही आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.
'जिल्ह्याचे नेतृत्व जबाबदार'
प्रकाश सोळंके म्हणाले, मागील अडीच वर्षापासून या जिल्ह्याचे कोण नेतृत्व करत आहेत त्यांचं नाव घेतलं पाहिजे असं काही नाही. आता खंडणीच्या गुन्ह्यात जे आरोपी आहेत वाल्मिक कराड त्यांच्यामाध्यमातून हे सुरू आहे. या सर्व प्रकारामध्ये आमच्या जिल्ह्याचे नेतृत्व जबाबदार आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, असंही आमदार सोळंके म्हणाले.
"बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले तर जिल्ह्याची परिस्थिती बदलेलं असं मला वाटतं, असंही सोळंके म्हणाले.