करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 13:40 IST2021-09-06T13:35:55+5:302021-09-06T13:40:50+5:30
पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या करूणा शर्मांना ( Kruna Sharma ) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ( Karuna Sharma remanded in judicial custody for 14 days)
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादनुसार जातीवाचक शिवीगाळ का करत आहेस असा जाब विचारल्याने रविवारी (दि.०५) दुपारी १.३० वा. वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा शर्माने (रा. मुंबई) बेबी छोटुमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले. त्यामुळे तिच्या उजव्या हातास जखम झाली. यावेळी अरूण दत्तात्रय मोरे (रा. मुंबई) याने त्याच्या हातातील चाकूने गुड्डू छोटूमियां तांबोळी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर वार केला व घाडगे यांना जातीवाचक शिवागाळ केली. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. करूणा शर्मा यांना अटक करून सोमवारी अंबाजोगाई सत्र न्यायलयासमोर हजर केले. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक
करुणा शर्मा यांनीच मांडली स्वतःची बाजू
या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर, करुणा शर्मा यांचे वकील पोहोचू न शकल्याने त्यांनी न्यायालयासमोर स्वतः बाजू मांडली.
न्यायालय परिसरात गर्दी
कोरोना शर्मा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी सकाळी आणले असता न्यायालय परिसरात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.मात्र अगोदर पासुनच पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी प्रवेश द्वारावरच कडक पहारा ठेवल्याने अनेकांचा हिरमोड झाला.