करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 12:46 PM2021-09-06T12:46:29+5:302021-09-06T12:57:44+5:30

करुणा शर्मा यांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी शहरात जीपमधून (एमएच ०४ एचएन-३९०२)आगमन झाले.

One arrested along with Karuna Sharma on charges of atrocity and attempted murder | करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

Next
ठळक मुद्देकरुणा शर्मा यांच्या गाडीत आढळले पिस्तूल आढळ्याने खळबळ उडाली होती  मंदिर परिसरात महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपात ॲट्रॉसिटी दाखल

परळी (जि.बीड) : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचा ५ सप्टेंबर रोजीचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेताना काही महिलांनी त्यांना घेराव घातला. यादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले आहे. ( One arrested along with Karuna Sharma on charges of atrocity and attempted murder) 

करुणा शर्मा यांनी व्हिडीओद्वारे परळीत येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणाही दक्ष होती. करुणा शर्मा यांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी शहरात जीपमधून (एमएच ०४ एचएन-३९०२)आगमन झाले. परळीत पाऊल ठेवताच त्यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, सकाळी आठ वाजेपासूनच शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी जमाव पांगवून करुणा यांच्या गाडीचा मार्ग मोकळा केला. मंदिरात दर्शनासाठी जाताना एकच गोंधळ उडाला. यावेळी काही महिलांनी करुणा शर्मा यांना घेराव घालून इथे का आलात, असा सवाल करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी करुणा शर्मा व मुंडे समर्थक महिलांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. त्यामुळे त्यांना पायरीदर्शनही घेता आले नाही. यावेळी मुंडे समर्थकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली.

दरम्यान, करुणा शर्मा यांना त्यांच्या गाडीत बसवून शहर ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांना एका दालनात बसवून चौकशी सुरू केली. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना मागील डिकीत पिस्तूल आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. यावेळी करुणा शर्मा यांच्या गाडीच्या चालकास ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. याचदरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा घाडगे यांनी शहर ठाण्यात करुणा शर्मा व अरुण दत्तात्रय मोरे यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार, वैद्यनाथ मंदिरासमोर विशाखा घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ का करता, असे विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियाॅ तांबोळी यांचा उजवा हात ओढून खाली पाडले तर अरुण मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पाेटावर चाकूने वार केला. जखमी बेबी तांबोळी यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाखा घाडगे यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आज सकाळी त्यांना अंबाजोगाई न्यायालयात नेण्यात आले आहे. 

गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल
करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्यानेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पिस्तूलसंदर्भात उशिरापर्यंत पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नव्हते. खातरजमा सुरू होती. त्यामुळे पिस्तुलाबाबत नोंद झाली नव्हती.

Web Title: One arrested along with Karuna Sharma on charges of atrocity and attempted murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.