आदर्श गाव कोळवाडीची मंत्रालयातील पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:15+5:302021-07-25T04:28:15+5:30

बीड : तालुक्यातील शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ग्रामपंचायत कोळवाडीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी स्मिता राणे ...

Inspection of Adarsh Gaon Kolwadi by a team from the Ministry | आदर्श गाव कोळवाडीची मंत्रालयातील पथकाकडून पाहणी

आदर्श गाव कोळवाडीची मंत्रालयातील पथकाकडून पाहणी

बीड : तालुक्यातील शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ग्रामपंचायत कोळवाडीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी स्मिता राणे व त्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या पथकाने आदर्श कोळवाडी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व लोकसहभागातून गावाचा कसा विकासात्मक कायापालट घडवून आणला या विषयी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. हे गाव आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्पर्धेत उतरले आहे. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व चौदावा वित्त आयोग निधीतून बांधलेल्या सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीबद्दल राणे यांनी प्रशंसा केली. प्रत्येक गावामध्ये कोळवाडीसारखे सुसज्ज असे सर्व सोयी सुविधायुक्त ग्रामपंचायत कार्यालय आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. गावातील गांडूळ खत प्रकल्प, भूमिगत गटारे, सार्वजनिक रस्त्यावर, शाळेच्या प्रांगणात बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक, नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध आरओचे पाणी, आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, डिजिटल शाळा, अंगणवाडी, शाळेतील मुलां-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व मुतारीची व्यवस्था, गावातील वृक्ष लागवड व संगोपन आदी विकास कामांबद्दल तसेच गावामध्ये मागील ५ वर्षांपासून टिकवून ठेवलेल्या स्वच्छतेच्या सातत्याबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी स्मिता राणे यांच्या पथकात उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, विभागीय समन्वयक रसाळ, आशिष थोरात, राज्य पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशनचे धनावडे , उगले, वाणी आदी सहभागी होते. यावेळी सरपंच द्राैपदी वाघमारे, ग्रामसेवक सखाराम काशिद, उपसरपंच तुळशीदास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य लहू शिंदे, आकाश शिंदे, गोरख जाधव, शिवलाल शिंदे, अर्जुन जाधव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

शौचालय बांधकामात कोळवाडी पॅटर्न असावा

या पथकाने गावामध्ये काही कुटुंबांना भेटी देऊन वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, डासमुक्त शोष खड्ड्यांची पाहणी केली. स्वच्छ भारत मिशन व जागतिक बँक निधीमधून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार, लाईट, पाणी व वॉश बेसिनच्या व्यवस्थेसह झाल्याने समाधान व्यक्त केले. बीड जिल्हयातील सर्वच सार्वजनिक शौचालये बांधकाम करताना कोळवाडीचा आदर्श घ्यावा असे म्हटले.

240721\24_2_bed_12_24072021_14.jpeg~240721\24_2_bed_11_24072021_14.jpeg

कोळवाडी पाहणी~कोळवाडी पाहणी

Web Title: Inspection of Adarsh Gaon Kolwadi by a team from the Ministry