बीड : कोरोनाकाळात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना आपला व्यवसाय गमवावा लागला. अनेकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती कोरोनामुळे मृत झाला आहे. त्यामुळे हा परिवार नैराश्यात आहे. हा आघात अनेकांना सहन होणारा नाही. त्यामुळे अनेक कुटुंब कोरोना होऊन गेल्यानंतर किंवा काही अप्रिय घटना घडून गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे समोपदेशन उपचार घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण ७ ते १० टक्क्यांनी वाढल्याचेदेखील चित्र आहे.
अनेक कुटुंबाला भविष्याची चिंता सतावत आहे, तर काही व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा आधार घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन केले तरी कोरोनाच्या धक्क्यातून अनेकजण बाहेर काढण्यासाठी नातेवाईक मित्रांसोबत मानसोपचार तज्ज्ञांचादेखील आधार घेतला जात आहे. मात्र, अनेकजण अद्यापदेखील आपले दु:ख लपवून ठेवत आहेत. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तसेच शरीरावर होत आहे. जेवण न जाणे, कमी बोलणे, रात्री झोप न येणे अशी लक्षणे दिसून येत आहे. याचा परिणाम कामकाजावरदेखील होत आहे. यासाठी त्यांना मानसिक आधाराची गरज असल्याचे दिसून येत आहे.
....
चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या
मागील वर्षी पीक चांगले आले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाली आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरूनदेखील त्याचा लाभ न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या वर्षात कोरोना काळातदेखील आतापर्यंत तब्ब्ल ७४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, ही चिंतेची बाब आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. ठोस उपाययोजना करण्यात ते अपयशी झाले आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याने चिंताग्रस्त होऊन आत्महत्येसारखा पर्याय अवलंबू नये. असे विचार येत असल्यास संपर्क करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.
...
हे दिवसही जातील
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण व्यवसायात बुडाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.
लॉकडाऊन उघडताच पुन्हा आशेचा किरण दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना हिंमतीने करण्याची गरज आहे.
कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय हेही दिवस जातील, असा विश्वास बाळगणे आवश्यक आहे.
...
मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात.....
पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना रात्रीची झोप येत नाही. काहींना घाबरल्यासारखे होते. लैंगिक आजाराचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. यातून मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे.
-डॉ. सुदाम मोगले, मानसोपचार तज्ज्ञ.