घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:02 IST2025-10-30T16:01:38+5:302025-10-30T16:02:10+5:30
बीड, अहिल्यानगर, परभणी,छत्रपती संभाजीनगर यासह अन्य ठिकाणी १३ गुन्हे दाखल

घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
- नितीन कांबळे
कडा (बीड): दिवसा व रात्री घरफोड्यात माहिर असलेल्या गेवराई तालुक्यातील भैय्या काळेला ( २७ रा.सोनवणे वस्ती चकलंबा ता.गेवराई) आष्टी पोलिसांनी राहत्या घरातून अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सराईत गुहेगार भैय्या काळेवर विविध जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
आष्टी शहरात २५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घरफोडी करून सोन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याचा सलीम सत्तार खान पठाण याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास करताना आष्टी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गेवराई तालुक्यातील भैय्या मंत्री काळे याने ही घरफोडी केली आहे. ही माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर, नागेश लोमटे,पोलीस अंमलदार मजरूद्दीन सय्यद यांनी बुधवारी रात्री त्याच्या राहत्या घरी धाड टाकून त्याच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या.
घरफोड्या व जिवे मारण्याचा प्रयत्नसह १३ गुन्हे दाखल
अटक आरोपी भैय्या काळेने बीड, अहिल्यानगर, परभणी, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या असून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला आहे. घरफोड्या व जिवे मारण्याचा प्रयत्न असे १३ गुन्हे त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे. विशेष म्हणजे त्याने दिवसा देखील अनेक घरफोड्या केल्या असल्याची चर्चा आहे.