"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:36 IST2025-10-02T14:32:10+5:302025-10-02T14:36:20+5:30
Pankaja Munde Speech: भगवान गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली.

"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
Pankaja Munde Dasara Melava Speech: "गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं. तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती करतो", असे म्हणत कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
भगवान गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरही भाष्य केले.
पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना टोला?
"माझ्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या, निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले. त्याची कधी जात पाहिली नाही. जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली. मी जात पाहणं शिकलेच नाहीये. मी भेदभाव करणे शिकलेच नाहीये", असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार सुरेश धसांनाही टोला लगावला.
पुरामुळे जातीपातीचे जोखड गळून पडले
"आज या लोकांचे संसार वाहून गेले. या गावामध्ये गेले, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या घरात सुखाचा घास माझ्या पोटात गेला नाही. मी एक बघितलं की, जाती-पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या साखळ्या, सगळे जोखड गळून पडले. माणूस माणसाच्या मदतीला धावून आला", असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
"या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही. पण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने मी शब्द देते की, या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे", असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
जातीवादाचे राक्षस उभे राहत आहेत -पंकजा मुंडे
"शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की, तुम्ही काहीही काळजी करू नका. नऊ दिवस नवरात्र होतं की नाही? नऊ दिवस आपण दुर्गेची पूजा केली. दुर्गा मातेने राक्षस संपवून टाकले. आजच्या कलयुगात राक्षस जन्माला आला आहे. हा राक्षस तुमच्या बुद्धीत आला आहे. चुकीच्या गोष्टीतून, चुकीच्या तोंडातून हे राक्षस उभे राहत असून, तो जातीवादाचे राक्षस आहेत", अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.