शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या; जयंत पाटलांनी केली भरीव मदतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:52 IST2025-09-26T16:50:38+5:302025-09-26T16:52:29+5:30
पशुधन आणि दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत द्यावी

शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या; जयंत पाटलांनी केली भरीव मदतीची मागणी
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : आष्टीसह मराठवाड्यात, सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी एकरी ५० हजार रूपये ठोस मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी कडा येथील नुकसानीची पाहणी करताना केली.
आष्टी तालुक्यातील अनेक गावात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी कडा, चोभानिमगाव, शिराळ या नुकसानग्रस्त गावांना माजीमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये तर खरडून गेलेल्या जमीनीसाठी ३० हजार, पशुधनासाठी ६० ते ७० हजार रूपये अशी भरीव मदत द्यावी. तसेच दुकानदारांचे देखील मोठे नुकसान झाले असून त्यांना देखील त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. सरकारकडे खूप पैसा आहे, असे आम्हाला वाटते. नुकसानग्रस्तांना ही मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीच्या जुन्या मागणीसाठी अधिवेशनात पुन्हा आवाज उठवणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले.
यावेळी बीडचे खा. बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संगीता ठोंबरे, सुशीला मोराळे, राजे साहेब देशमुख, आणासाहेब चौधरी, सतीश शिंदे, राम खाडे, सुनील नाथ, अमोल तरटे, शेख रिझवान, संजय थोरवे, अशोक पोकळे, जगनाथ ढोबळे, राहुल काकडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.