बीड जिल्ह्यातील सायगावमध्ये हवेत गोळीबार; दोन परदेशी बनावटीच्या पिस्तुलांसह आरोपीस बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:18 IST2026-01-23T18:18:07+5:302026-01-23T18:18:53+5:30
परदेशी बनावटीची शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त; १.३३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

बीड जिल्ह्यातील सायगावमध्ये हवेत गोळीबार; दोन परदेशी बनावटीच्या पिस्तुलांसह आरोपीस बेड्या
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर पिस्तूलमधून गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी (वय ३५) या तरुणाला बर्दापूर पोलिसांनी अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी परदेशी बनावटीची दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सायगाव येथे २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास ही थरारक घटना घडली. आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याने आपल्या ताब्यात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केला. शांत असलेल्या सायगाव परिसरात अचानक गोळ्यांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले आणि गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी वेढा घालून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची आणि घटनास्थळाची झडती घेतली असता त्याच्याकडे विदेशी बनावटीची ९ एमएम पिस्तूल, बनावटीची चांदीच्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (एमएच २३ आर ०३१७) हीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार गणेश विक्रम तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबाराचे कारण काय?
सदर आरोपीने ही घातक परदेशी बनावटीची शस्त्रे कोठून आणली आणि भरवस्तीत गोळीबार करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक घुले करत आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून, सध्या गावात शांतता आहे.