'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:45 IST2025-08-22T12:42:44+5:302025-08-22T12:45:10+5:30
Beed Crime News: बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता एकाच बॉयफ्रेन्डच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली. या प्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या ही गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील रहिवासी होती. चार वर्षांपूर्वीच तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. अयोध्याला तीन वर्षाची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये रुजू झाली आणि पोलीस भरतीची तयारी करत होती. त्यासाठी ती बीड शहरातील अंबिका चौकात राहत होती. अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, गेल्या काही दिवसांत अयोध्या आणि राठोड यांच्यात जवळीक वाढली. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वादातून फडताडे हिने एका मित्राच्या मदतीने अयोध्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फडताडे हिने अयोध्याला घरी बोलावून घेतले आणि तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकला. याप्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक करण्यात आली.