सुविधा, सेवांबद्दल रुग्ण, नातेवाइकांची घेणार प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:24+5:302021-06-17T04:23:24+5:30

बीड : जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर चांगल्या, वाईट अनुभवांसह सुविधा आणि सेवा कशा आहेत, याबाबत आरोग्य विभाग रुग्ण व ...

Feedback from patients, relatives about facilities, services | सुविधा, सेवांबद्दल रुग्ण, नातेवाइकांची घेणार प्रतिक्रिया

सुविधा, सेवांबद्दल रुग्ण, नातेवाइकांची घेणार प्रतिक्रिया

बीड : जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर चांगल्या, वाईट अनुभवांसह सुविधा आणि सेवा कशा आहेत, याबाबत आरोग्य विभाग रुग्ण व नातेवाइकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डात अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. याच अर्जाच्या अनुषंगाने सुधारणा केल्या जाणार आहेत. नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ही संकल्पना सुरू केली आहे.

जिल्हा रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून तक्रारी वाढल्या होत्या. सेवा आणि सुविधा मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांमधून ओरड होती. वारंवार तक्रारी करूनही यात सुधारणा होत नसल्याने अनेकांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. आता याच तक्रारी कमी करण्यासह त्यात सुधारणा करण्यासाठी डॉ. साबळे यांनी नवी संकल्पना राबविली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांची प्रतिक्रिया घेण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येकाकडून हा अर्ज भरून घेणे बंधनकारक केले जाणार आहे. यामुळे सामान्यांच्या मनातील भावना आणि समस्या पुढे येतील आणि त्यात सुधारणा करणे शक्य होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. पहिल्यांदाच अशी संकल्पना राबविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

...

तीन तक्रारी आल्यास कारवाई

वॉर्डमधील सुविधा, सेवा, नर्सेस, डॉक्टर, कर्मचारी, वॉर्डबॉय यांचे वागणे, संवाद उपचारातील दुर्लक्ष अथवा इतर तक्रारींबद्दल मनोगत घेतले जाणार आहे. चांगले, खूप चांगले, बरे आणि खराब, असे यात पर्याय देण्यात आले आहेत. एखाद्याविरोधात तीन तक्रारी झाल्यास पहिल्यांदा नोटीस आणि दुसऱ्या वेळेस थेट कारवाई केली जाणार आहे. याबाबत सर्वांना सक्त सूचना केल्या जातील, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

---

आम्ही पूर्णपणे बरोबर असूच असे नाही. काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. यासाठीच प्रतिक्रिया घेण्याची संकल्पना सुरू केली आहे. यातील तक्रारी आणि मनोगतांचा आम्हाला सुधारणा करण्यासाठी फायदा होणार आहे. तीनपेक्षा जास्त तक्रारी दिसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: Feedback from patients, relatives about facilities, services