एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 20:32 IST2025-11-24T20:30:24+5:302025-11-24T20:32:34+5:30
Dhananjay Munde-Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
Dhananjay Munde-Walmik Karad: राज्यभरात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेत आहेत. अशातच, परळीत झालेल्या महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या एका विधानाने मोठी खळबळ उडवली आहे. आपल्या भाषणात धनंजय मुंडेंनासंतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची आठवण झाली. या मेळाव्यात पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या.
काय म्हणाले मुंडे?
सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, चोवीस तास जगमित्र कार्यालय सुरू असायचे. आज 9-10 महिने झाले, कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे; पण हे बोलताना आपल्याबरोबर एक व्यक्ती नाही, याची जाणीव होते. माझ्या एका कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव जाणवते. काय चुकले, काय नाही ते न्यायालय पाहील, असे वक्तव्य मुंडेंनी केले. त्यांनी नाव घेतले नसले तरी, हे वक्तव्य वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कारण, जगमित्रच्या माध्यमातून वाल्मिक कराड सर्व कामे पाहायचा.
धनंजय देशमुखांची मुंडेंवर टीका
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणले, एवढे दिवस मुंडे म्हणत होते की, त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण आता त्यांच्या विधानातून त्यांना सगळं माहीत होतं हेच स्पष्ट होतं आहे. आरोपी कराड चुकीची कामं करायचा, खंडणी गोळा करायचा. तरीही त्याची उणीव त्यांना भासते, हे लोकप्रतिनिधीस शोभणारे नाही. ज्यांनी पाप केले त्यांना शिक्षा मिळणारच. चर्चेचा विषय असायला हवा होता की, एका निष्पाप माणसाला का मारले? पण काळजी मात्र आरोपीबद्दलच अधिक दिसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मनोज जरांगे संतापले...
मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही जर तो (धनंजय मुंडे) म्हणत असेल की, मला 'त्याची' उणीव भासती, तर त्याच्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही. तो गोरगरीब लेकरांचे मुडदे पाडत असेल तर अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं? आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल, असे जरांगे म्हणाले.
काय आहे संतोष देशमुख प्रकरण
9 डिसेंबर 2024 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे खंडणीचा वाद असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल आहे. काही दिवस फरार राहिल्यानंतर कराडने आत्मसर्पण केले, तेव्हापासून कराड न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले आहे.