मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या वादात स्वच्छतेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:15+5:302021-07-05T04:21:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : नगरपालिकेचे मुख्याधिकारी व स्वच्छता ठेकेदार यांच्यात तीन दिवसापूर्वी शहरातील स्वच्छतेवरून वाद झाला होता. यामुळे ...

Cleaning work stalled in chief-contractor dispute | मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या वादात स्वच्छतेचे काम ठप्प

मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या वादात स्वच्छतेचे काम ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : नगरपालिकेचे मुख्याधिकारी व स्वच्छता ठेकेदार यांच्यात तीन दिवसापूर्वी शहरातील स्वच्छतेवरून वाद झाला होता. यामुळे ठेकदाराने तीन दिवसांपासून स्वच्छतेचे काम थांबविले आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, पालिका पदाधिकाऱ्यांनी याविषयी मौन पाळले आहे.

माजलगाव शहर स्वच्छ राहावे, यासाठी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष सुमनबाई मुंढे यांनी नोव्हेंबर महिन्यात स्वच्छतेचे टेंडर काढले होते. हे टेंडर दिल्यापासून ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. हा ठेकेदार दिलेले नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळत आहे.

ठेकेदाराकडून गोळा केलेला कचरा केसापुरी येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकून, त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी या ठिकाणी तो कचरा वारंवार जाळत असतो. तर काही वेळा डम्पिंग ग्राउंडवर मोठमोठे खड्डे करून त्यामध्ये कचरा टाकण्यात येत होता. यामुळे केसापुरी येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या विरोधात केसापूर येथील नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडविल्या होत्या. हा ठेकेदार वारंवार सिंदफणा नदीपात्रात शेजारील कचरा टाकत असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. त्याचबरोबर, कचरा घेऊन जाताना ओला व वाळलेला कचरा वेगवेगळ्या घेऊन जाण्याऐवजी एकाच गाडीत हा कचरा घेऊन जातात.

शहरातील नाल्या दररोज काढण्याऐवजी मुख्य रस्त्यावरील नाल्या वगळता, गल्लीबोळातील नाल्या महिना-दोन महिन्यांनी काढण्यात येतात. अशा प्रकारे टेंडरधारक ठेकेदाराची मनमानी सुरू होती. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पदाधिकारीही याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत.

------

आठ महिन्यांनंतर आली जाग

स्वच्छतेचे टेंडर सुरू होऊन सात ते आठ महिने झाले. या काळात संबंधित ठेकेदाराने मनमानी कारभार केला. ही मनमानी सुरू असताना व अनेक तक्रारी येत असतानाही मुख्याधिकारी भोसले यांनी ठेकेदाराला कधीच जाब विचारला नाही. आताच कसा जाब विचारला, असा सवाल नगरसेवकांकडून विचारला जात आहे.

-----

मी तीन दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदारास सध्या त्याच्याकडे असलेल्या काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी मागितली. ज्या ठिकाणी घंटागाडी जाते. तेथील नागरिकांच्या सह्या केलेले रजिस्टर मागितले. घालून दिलेल्या अटीनुसार काम सुरू आहे का, असे विचारणा केली. यानंतर, या ठेकेदाराने स्वच्छतेचे काम थांबविले आहे.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगरपरिषद, माजलगाव.

....

Web Title: Cleaning work stalled in chief-contractor dispute