रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:17 IST2026-03-05T11:54:53+5:302026-03-05T12:17:13+5:30

रिक्षात आधीच बसले होते गुंड, बसस्थानकाऐवजी नेलं निर्मनुष्य स्थळी; १८ वर्षांच्या तरुणाला लुटलं, थरारक घटना

Chhatrapati Sambhajinagar: Auto Driver and Accomplices Rob Youth, Push Him Out of Moving Rickshaw | रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

छत्रपती संभाजीनगर : प्रवासी तरुणाला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण करुन रिक्षाचालकाने लुटले. ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात त्याच्याकडील पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून ढकलून देत तो पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी २ मार्च रोजी रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या दोन गुंड साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील गेवराईचा असलेला ओम संजय राठोड (१८) हा २८ फेब्रुवारी रोजी रामनगरमध्ये राहणाऱ्या मामाला भेटण्यासाठी शहरात आला होता. दिवसभर त्याला भेटून रात्री तो गेवराईला जाण्यासाठी निघाला. सिडको बसस्थानकावर जाण्यासाठी तो रामनगर विठ्ठलनगर रिक्षा थांब्यावर येऊन थांबला. समोर आलेल्या रिक्षात तो बसला. त्याच्या आधीच रिक्षाचालकाचे गुंड साथीदार प्रवासी म्हणून रिक्षात बसलेले होते. चालकाने रिक्षा बसस्थानकाऐवजी अचानक सुसाट वेगात धूत रुग्णालयाच्या दिशेने वळवून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत नेली. ओम याला मारहाण करून धमकावले. अजिंठा फार्मा कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य परिसरातील मार्गावर नेत त्याच्या मोबाईलमधील डिजिटल वॉलेटमधून ऑनलाईन ३६० रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर खिशातील २ हजार रुपये व मोबाईल हिसकावून रिक्षातून ढकलून देत पसार झाले. मुकुंदवाडी पोलिस तपास करत आहेत.

प्रवाशांची सुरक्षा व रिक्षाचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सर्वसामान्य व प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक गुंंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हेगारांनी प्रवेश केला. त्यातून अनेकदा प्रवाशांची लुटमार, प्राणघातक हल्ले, शिवीगाळ, महिला, तरुणींसोबत गैरप्रकाराच्या घटना शहरात घडल्या. अशाच गुन्हेगार रिक्षाचालकांनी थेट पोलिसांवरच प्राणघातक हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, तरीही गुन्हेगार रिक्षाचालकांमुळे नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar: Auto Driver and Accomplices Rob Youth, Push Him Out of Moving Rickshaw