Beed: व्हाइटनरच्या नशेतून तरुणाचा कुटुंबावर चाकूने हल्ला; आजीचा मृत्यू, आई-वडिल जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:49 IST2025-08-12T13:49:04+5:302025-08-12T13:49:32+5:30
हल्ल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल; न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी

Beed: व्हाइटनरच्या नशेतून तरुणाचा कुटुंबावर चाकूने हल्ला; आजीचा मृत्यू, आई-वडिल जखमी
परळी : येथील फुलेनगरात घरासमोर व्हाइटनरच्या नशेतून स्वतःच्या आई, वडील व आजीवर सुरीने हल्ला केल्याप्रकरणी १० ऑगस्ट रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात अरबाज कुरैशी (वय २२) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अरबाज कुरैशी यास संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. रविवारी सकाळी परळी न्यायालयात हजर केले असता अरबाज कुरैशी यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
परळी शहरातील उड्डाणपुलाजवळील फुलेनगर भागात घरासमोर शनिवारी दुपारच्या सुमारास व्हाइटनरच्या नशेत असलेल्या अरबाज रमजान कुरैशी (वय २२) याने स्वतःची आई समिरा कुरैशी (४५), वडील रमजान कुरैशी (५०) आणि आजी जुबेदाबी कुरैशी (९०) यांच्यावर सुरीने वार केले. त्यामध्ये वृद्ध आजी जुबेदा कुरैशी यांच्या मानेवर पाठीमागून सुरीने वार केल्याने रात्री मृत्यू झाला. आईच्या तोंडावर सुरीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वडिलांना डाव्या हाताच्या दंडावर व पाठीवर वार करून जखमी केले. या दोघांवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी रमजान रहीम कुरैशी यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर त्यांचा मुलगा अरबाज रमजान कुरैशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यास अटक करण्यात आली आहे. रविवारी परळी कोर्टात सादर करण्यात आले. त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे तपास करीत आहेत.