Beed: वाहनाची धडक की नियंत्रण सुटले; कुटुंबाचा आधारवड असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:18 IST2026-01-05T15:18:33+5:302026-01-05T15:18:33+5:30
कडा-लिंबोडी रोडवर दुचाकीला अपघात; दोन मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं

Beed: वाहनाची धडक की नियंत्रण सुटले; कुटुंबाचा आधारवड असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
- नितीन कांबळे
कडा (आष्टी): आष्टी तालुक्यातील कडा-लिंबोडी रस्त्यावर सोमवारी दुपारी एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अनिल मोहन खिलारे (वय ४५, रा. सांगवी पाटण) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
अनिल खिलारे हे सोमवारी दुपारी कडा शहरातून आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 AK 1133) गावाकडे निघाले होते. पाचेवस्ती जवळ आले असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला की दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते कोसळले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या अपघातात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर, नंदकिशोर सवासे आणि अमोल नवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मयत अनिल खिलारे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी पेलणाऱ्या अनिल यांच्या अचानक जाण्याने खिलारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.